आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Redirekana Redirekanara Increased So Expensive Dream House

रेडीरेकन रेडीरेकनर वधारल्याने महागणार घराचे स्वप्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सामान्य अमरावतीकरांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न रेडीरेकनर वधारल्याने भंगणार आहे. शहराच्या आसपास असलेली शेतजमीन, घरे बांधण्यासाठी भूखंड आणि सदनिका खरेदी करणा-या सर्वसामान्यांच्या खिशांवरही यामुळे अतिरिक्त बोजा वाढणार आहे.

नवीन वर्षाकरिता रेडीरेकनरचे दर जाहीर झाले आहेत. त्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 15 ते 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. एक जानेवारीपासून नव्या वार्षिक बाजारमूल्य तक्त्यानुसार खरेदी-विक्री सुरू झाली असल्याची माहिती नोंदणी सहनिबंधक सुखदेव शेगोकार यांनी दिली आहे. नवे बाजारमूल्य जाहीर झाल्याने शहरातील मोकळ्या भूखंडांचे दर 15 ते 20 टक्‍क्‍यानी सदनिकांचे दर 25 ते 35 टक्क्यांनी आणि व्यवसायिक जागांचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत. परिणामी घरे आणि प्लॉट खरेदी करणा-या ग्राहकांवर मुद्रांक शुल्क आणि एलबीटीसोबतच आणखी काही करांचाही भार सर्वसामान्यांवर वाढणार आहे. अर्थात सध्या बाजारमूल्याच्या तुलनेत घरांच्या किमती वाढणार असल्याचे गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

तयार इमारतीचे व्यवहार महागले; 50 टक्के एवढी वाढ
आर.सी.सी. बांधकाम असलेल्या इमारतीच्या भूखंडाचे दर वगळून केवळ बांधकामासाठी 17 हजार रुपये प्रति चौरस मीटर असे बाजारमूल्य गृहित धरून मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहे. यापूर्वी हा दर 11 हजार रुपये प्रति चौरस मीटर एवढा होता. यात आणखी पन्नास टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे. सदनिकांच्या बांधकामामध्ये प्रति चौरस मीटर 17 हजार रुपये आणि त्या भागात भूखंडाकरिता असलेले बाजारमूल्य असे मिळून मुद्रांक शुल्क आणि एलबीटी कर आकारला जाणार आहे. हा दर सर्व महापालिकांकरिता अनिवार्य असून, नगरपरिषदांकरिता तो 13 हजार 600 आणि ग्रामीण भागात 10 हजार 200 एवढा असणार आहे. हक्काचे घरांसाठी सर्वसामान्यांना मात्र मोठी तारेवरच कसरत करावी लागेल.

सर्वसामान्य ग्राहकांना भुर्दंड
४रेडीरेकनर 50 टक्क्यांपर्यंत वधारले आहेत. त्याचा बोजा हा सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. सदनिका खरेदी करताना मुद्रांक शुल्क आणि स्थानिक संस्था कर पन्नास टक्क्यांनी जादा द्यावा लागणार आहे. हा खर्च सदनिका खरेदी करणाºया ग्राहकांना करावा लागणार आहे. हा आत चिंतेचा विषय झाला असून, खर्च अवाक्याबाहेरचा आहे.
राजू देव,बांधकाम व्यवसायी अमरावती.

साधारणत: 15 ते 20 टक्के दरवाढ
४बुधवारपासून सुरू झालेल्या व्यवहारावरून असे लक्षात येते, की रेडीरेकनरच्या दरात साधारणत: 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. मात्र, ही दरवाढ शहरातील प्रत्येक भागानुसार वेगवेगळी असल्याने काही भागांमध्ये याचे दर आणखी जास्त असू शकतील. सदनिकांचे दर 25 ते 35 टक्क्यांनी आणि व्यवसायिक जागांचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत.
सुखदेव शेगोकार, नोंदणी सहनिबंधक.

असा ठरतो दर :वर्षभरात कोणत्या परिसरात किती व्यवहार कोणत्या दराने झाले, याचा अभ्यास करून त्याचा अहवाल महसूल प्राधिकरणाकडे पाठवला जातो. या अहवालाला मंजुरी मिळाल्यानंतर रेडीरेकनरचे दर निश्चित होतात. परिसरानुसार रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. यामुळे तो दर याच परिसरातील रोड फ्रंट, विकसित परिसर, अविकसित भाग आणि पायाभूत सुविधा असलेल्या बागांनाही लागू होतो. यामुळे सर्वच परिसराला करण्यात येणारी एकसमान दरनिश्चिती सर्वसामान्यांना अन्यायकारक ठरते.