आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभार काढून अधिकार्‍यांना निलंबित करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-नगरसेवक अपात्रतेच्या प्रकरणाशी संबंधित अधिकार्‍यांकडील अतिरिक्त प्रभार काढून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे. याबाबत महापालिकेतील गटनेते आणि नगरसेवकांनी आयुक्त अरुण डोंगरे यांची शुक्रवारी भेट घेतली.
राज्य मुख्य निवडणूक आयुक्तांनी सात नगरसेवकांचे पद अबाधित राखण्याचा निर्णय देत महापालिका प्रशासनाला फटकारले. त्यासंबंधी आदेशाची प्रत देण्यासाठी आयुक्त अरुण डोंगरे यांची सर्व नगरसेवकांनी भेट घेतली. नगरसेवकांवरील अपात्रतेची कारवाई रद्द करण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. महापालिकेत एका अधिकार्‍याकडे विविध विभागांचे प्रभार देण्यात आल्यामुळे विकासकामांना खीळ बसत असल्याकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले. या प्रकरणाशी संबंधित अधिकार्‍यांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर पाठवण्यासोबतच अतिरिक्त प्रभार काढून घेण्याचीही मागणी करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड. किशोर शेळके, उपमहापौर नंदकिशोर वर्‍हाडे, गटनेते अविनाश मार्डीकर, संजय अग्रवाल, सभापती नीलिमा काळे, रिना नंदा, चंदुमल बिल्दानी.
भूषण बनसोड, प्रा. प्रदीप दंदे, जयर्शी मोरे, हफिजा बी, ममता आवारे, मिलिंद बांबल, आशा निंधाने आदी उपस्थित होते.
अधिकार्‍यांवर कारवाई न केल्यास आंदोलन : नगरसेवक अपात्रतेच्या प्रकरणामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले गेले. या संपूर्ण प्रकरणात महानगरपालिकेचीच बदनामी झाली आहे. या विषयात दोषी असलेल्या महापालिकेतील निवडणूक अधिकारी आणि संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप गटनेते संजय अग्रवाल यांनी केली. याकडे दुर्लक्ष केल्यास आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
महापालिकेतील सात नगरसेवकांचे अपात्र प्रकरण राजकीयदृष्ट्या चांगलेच गाजले होते .सदस्यत्व वाचविण्यासाठी नगरसेवकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. दरम्यान,अपात्र ठरविलेल्या सातही नगरसेवकांना राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलासा देत त्यांना पद बहाल केले. त्यामुळे अपात्र प्रकरणी ज्या अधिकार्‍यांनी वैयक्तिक स्वारस्य दाखविले,त्यांना घेरण्याची योजना आता आखली जात आहे.