आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताक दिनानिमित्त लागले आनंदाचे तोरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- प्रजासत्ताक दिनाच्या स्वागतासाठी शहर सजले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा रविवारी विभागीय क्रीडा संकुलावर सकाळी साडेनऊ वाजता होईल. पालकमंत्री तथा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे ध्वजारोहण करतील. या वेळी 28 विविध पथकं पथसंचलनात सहभाग घेत राष्ट्रध्वजाला सलामी देतील. या सोहळ्यात जिल्हा प्रशासनातील सात विभागांचे देखावेही आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे आनंद अन् उत्साहाचे वातावरण आहे.

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी विभागीय क्रीडा संकुल, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा सत्र न्यायालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्यासह सर्व शासकीय कार्यालयांनी तयारी पूर्ण केली आहे. शासकीय कार्यालयांवर रंगरंगोटी करण्यात आली आहे. शनिवारी विद्युत रोषणाईने ते उजळले होते. विभागीय क्रीडा संकुल येथे मागील आठ ते दहा दिवसांपासून पथसंचलनाची रंगीत तालीम केली जात होती. मुख्य कार्यक्रमात पोलिस कर्मचारी, विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, होमगार्ड आदी सर्व विभागांतील किमान एक हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. ध्वजारोहणानंतर जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य आणि वनसंपदा याविषयी माहिती देणारे देखावे सादर होतील. शहरात विविध शासकीय कार्यालयांसोबत शाळा, महाविद्यालय, संस्था तसेच चौकाचौकांमध्येदेखील प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांची धूम राहणार आहे.

28 पथकांची सलामी
विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित मुख्य सोहळ्यात विविध विभागांची 28 पथकं राष्ट्रध्वजाला सलामी देतील. ग्रामीण पोलिस दलाचे परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक तथा दर्यापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन गायकवाड वा परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक खान अब्दुल गनी पालकमंत्र्यांना मानवंदना देत पथकाचे नेतृत्व करतील.

जिल्ह्याचे वैभव दर्शवणार
पथसंचलनानंतर सात विविध विभागांच्या देखाव्यांचे प्रस्तुतीकरण केले जाणार आहे. जिल्ह्याच्या संपन्नतेचे दर्शन यातून उपस्थितांना घडणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग, आरोग्य विभागासह वनविभागाचे जलद कृती दल, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग, पूर्व वनविभाग चिखलदरा, कृषी विभाग आदी यामध्ये सहभागी होतील.

जड वाहनांना प्रवेशबंदी
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे आयोजन होत असते. या वेळी वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून सर्व हलकी व जड वाहनांना शहरात प्रवेशबंदीची अधिसूचना पोलिस आयुक्त अजित पाटील यांनी काढली. मुंबई पोलिस कायदा 1951 चे कलम 33 (1)(ब) अन्वये तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 155 अन्वये ही प्रवेशबंदी करण्यात आली आहे.