आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा कचेरीवर डेरा; मेंढय़ा,बैलगाड्यांसह आरक्षणासाठी धनगर समाज एकवटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या नागरिकांनी शनिवारी मेंढय़ा व बैलगाड्यांसह जिल्हा कचेरीवर धडक दिली. कपाळावर पिवळी माती ल्यालेले पुरुष व महिला, पिवळ्याच रंगाचे फलक आणि उपरणे, असा माहोल या आंदोलनामुळे तयार झाला होता. विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचच्या बॅनरखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष महात्मे यांनी केले.
आंदोलनात मोठय़ा संख्येने धनगरबांधव महिला व पुरुष सहभागी झाले होते. गगनभेदी घोषणा आणि पाहणार्‍यांची प्रचंड गर्दी ही या आंदोलनाची वैशिष्ट्ये ठरली. सायंस्कोर मैदानातून दुपारी दीडच्या सुमारास मोर्चाचा प्रारंभ झाला. समोर मेंढय़ा, मध्ये बैलगाड्या आणि अवतीभवती पुरुष-महिलांचा गराडा असे हे दृश्य होते. सायंस्कोर, कॅम्प मार्गे हा मोर्चा जिल्हा कचेरीवर पोहोचल्यानंतर त्याचे एका सभेत रूपांतर झाले.
याठिकाणी मोर्चेकर्‍यांनी आपली भूमिका व्यक्त केली. आदिवासींचे आरक्षण बाधित न होऊ देता निर्णय घ्या, अशी मागणी असतानाही आम्ही त्यांचेच वैरी आहोत, असे चित्र निर्माण केल्याबद्दल आंदोलनकर्त्यांनी शासनावर टीकेची झोड उठवली. शासन स्वत:च चुकीच्या पद्धतीने या मुद्दय़ाकडे पाहतोय, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मोर्चात संतोष महात्मे यांच्याशिवाय जानराव कोकरे, उमेश घुरडे, लक्ष्मणराव खाडे, अशोकराव गंधे, सुभाष गोहत्रे, हरिभाऊ शिंदे, अशोक इसळ, भय्यासाहेब तिरकर, अँड. आंचल कोल्हे, अवकाश बोरसे, शरद शिंदे, नीलेश मातकर, प्रदीप अलोने, वामन शिंदे, विनोद पुनसे आदी सहभागी झाले होते. यात ‘विदर्भ मेंढपाळ धनगर विकास’चे कार्यकर्ते सामील होते.
मंत्रीच करतात दिशाभूल
दर्‍याखोर्‍यात विखुरलेल्या धनगर समाजावर शासन नेहमीच अन्याय करीत आले आहे. शासन दिशाभूल करत असून, ज्यांनी पुढाकार घ्यावा, ते मंत्री स्वत:च हा मुद्दा चिघळवत आहेत. आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्यावर आंदोलनकर्त्यांनी हा आरोप लावला आहे.
1.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देण्यापूर्वी विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी असा मोर्चा काढला.
2. आरडीसी तेजूसिंग पवार यांना निवेदन देताना.
या आहेत मागण्या
धनगर समाजाला अनुसूचित जाती (एसटी) संवर्गाच्या सवलती द्या, मेंढी चराईकरिता जंगले राखीव ठेवा, परंपरागत वननिवासी असल्यामुळे त्यांना चूल पासही द्या, वनविभागाकडून वारंवार होत असलेला छळ थांबवा आदी मागण्यांसाठी हा लढा सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
महात्मे यांचा राजीनामा
दरम्यान, संतोष महात्मे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. मात्र, सत्तेत सहभाग असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धनगर समाजाला मदत करीत नाही, म्हणून मी राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.