आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत नागरिक खड्डय़ांनी त्रस्त, मंडळे खड्डे करण्यात गर्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- गणेशोत्सवानिमित्त कमानी उभारण्यासाठी रस्त्यांवर खड्डे करणार्‍यांवर आता मनपा दंडात्मक कारवाईची करणार आहे. मनपाच्या या भूमिकेनंतरही खड्डे करणे सुरूच असल्याने तत्कालीन पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली होती, तशीच भूमिका घेणे आवश्यक आहे.

शहरातील रस्त्यांच्या अवस्था वाईट अवस्थेने नागरिक हैराण आहेत, मात्र रस्ते दुरुस्तीच्या कामास अद्यापही वेग आलेला नाही. त्यातच गणेश मंडळांनी रस्त्यांवर खड्डे खोदून कमानी लावण्याचा सपाटा लावल्याने समस्या आणखीनच गंभीर झाली आहे.

गणेशोत्सवाला चार दिवस राहिल्याने गणेश मंडळांचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. आपले मंडळ अन्य मंडळांच्या तुलनेत सरस ठरावे, यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नात सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. शहराच्या मुख्य मार्गांवर कमानी लावण्यासाठी डांबरी रस्ते फोडले जात आहेत. या खड्डय़ांत आता बल्ली गाडून नेत्यांचे पोस्टर झळकणार आहेत. गणेशोत्सवानंतर हे खड्डे तसेच राहणार असून, त्यांचा पसारा हळूहळू वाढणार आहे. परिणामी, चांगल्या रस्त्यांची दुर्दशा होत आहे.

नागरिकांमध्ये नाराजी, मंडळांनी घ्यावी काळजी
शहरात काही निवडकच रस्ते चांगले आहेत. किमान ते चांगले राहावेत, यासाठी तरी मंडळांनी पुढाकार घ्यावयास हवा, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकदेखील संतापले आहेत.

डॉ. देशमुखांची ठोस भूमिका
तत्कालीन पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी रस्ते खोदण्याला तीव्र विरोध केला होता. चांगल्या रस्त्यांवर खड्डे करणार्‍यांवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिले होते. कोट्यवधी रुपये खर्च करून हे रस्ते बांधले जात असल्याने अशा पद्धतीने ते खोदता येणार नाहीत, असे निर्देशही त्यांनी दिले होते. त्यानंतर अशा पद्धतीने खड्डे करण्याची हिंमत कोणी केली नव्हती.

शहरातील रस्त्यांवर खड्डे करणे योग्य नाही. संबंधित मंडळांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
-अरुण डोंगरे, मनापा आयुक्त

ज्या मार्गाने गणेश मंडळांच्या मिरवणुका जाणार आहेत, ते मार्ग दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.
- ज्ञानेंद्र मेश्राम, शहर अभियंता, मनपा.