आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डेमय रस्त्यांवरूनच होणार बाप्पांचे आगमन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विघ्नहर्ताश्रीगणेशाचे यंदाही रस्त्यांवरील खड्ड्यांमधूनच आगमण होणार असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांसाठी कोट्यवधींचा निधी ओतूनही रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाही. रस्ते दुरुस्तीबाबत महापालिकेचे नियोजनच नसल्यामुळे उत्सवाच्या काळात अमरावतीकरांच्या आनंदावर विरजन पडणार असल्याची चिन्हे आहेत.
शहरातील रस्त्यांचे स्थिती दर्शविणारे फलक काही दिवसांपूर्वीच शहरात झळकले होते. फलकावर नमूद केल्याप्रमाणे मंगळ चंद्राप्रमाणे शहरातील रस्त्यांची स्थिती झाली असून याच खड्ड्यातून बाप्पाला यावे लागणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केल्या जातो. त्यामुळे चौका-चौकातील गणेश मंडळे बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागले आहे. शहरासह विदर्भातील अनेक शहर-गावांमधील गणेश मंडळांचे कार्यकर्ते येथून गणेश मूर्ती नेतात. अमरावती हे गणेश मूर्तींसाठी असलेली मोठी बाजारपेठ आहे. जुन्या शहराप्रमाणे बायपास मार्गावरदेखील मोठ्या प्रमाणात मूर्तीकार गणेशाला आकार देण्यात मग्न झाले आहे. गणेशाच्या आगमनाला केवळ तीन ते चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने आरक्षित करण्यात आलेल्या मूर्तींच्या सजावटीकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. लहानसह ते २० फुटापर्यंतच्या गणेश मूर्तीची निर्मिती येथे केली जाते. भव्य दिव्य मूर्ती बसविण्याकडे सार्वजनिक मंडळाचा कल असतो. मात्र, शहरातील रस्त्यांमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना मूर्तीची विशेष काळजी घ्यावी लागते. बाप्पाला विराजमान करण्यासाठी नेताना एखादा खड्डा आला अन् त्यात मूर्तीचे नुकसान होण्याची अधिक शक्यता आहे. काही प्रमुख रस्ते सोडल्यास सर्वच रस्त्यांची स्थिती सारखी आहे. शिवाय अनेक भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे कार्य पावसाळा आरंभ झाल्यानंतर आरंभ करण्यात आले. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गिट्टी पसरली असल्याचे दिसून येते. मागील वर्षी मंडळांनी पालिकेच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त करीत आंदोलनदेखील केले होते.
उत्साहावर पाणी
गणेशोत्वापासूनसण-उत्सवांचा कालावधी सुरू झाला आहे. यामुळे, शहरासोबतच जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण निर्माण आहे. नागरिक ‘फेस्टिव्ह मूड’ मध्ये आहेत. अमरावतीकरांना आतापासूनच गणेशाच्या आगमनाची चाहूल लागली असून तयारीस सुरूवात झाली आहे. लगेच गौरींचे आमगनही होणार आहे. गणपती, दुर्गोत्सव हे सार्वजनिक उत्सव असल्यामुळे या कालावधीत नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असतात. मात्र, त्याला चांगल्या रस्त्यांची जोड लाभल्यास आनंद द्विगुणीत होत असतो.
कामांना सुरुवात नाही
मोठ्याप्रमाणात निधी देऊनही अद्याप कामांना सुरुवात झाली नसल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी टप्प्या-टप्प्याने काम केल्या जात आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक अगोदरच त्रस्त आहेत. रेल्वेस्टेशन ते बेलपूरा रस्त्याचे काम अद्याप सुरु झालेले नसून अंबादेवी मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. मात्र, खड्डे अद्यापही कायम आहेत. शहरातील अंतर्गत रस्ते खराब असल्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करण्याची वेळ महापालिकेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.