आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन किलो चांदीसह सव्वाचार लाखांची चोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - साईनगर परिसरातील अनुराधानगर येथील नीलेश बाळासाहेब लोमटे यांच्या घरातून चोरट्यांनी साडेतीन किलो चांदी, सोन्याचे दागिने, रोख रक्कम व दुचाकी असा चार लाख 11 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. लोमटे कुटुंबीय लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते. ते परतल्यानंतर सोमवारी चोरी उघडकीस आली.

नीलेश लोमटे हे पाटबंधारे विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. ते शनिवारी (दि. 24) कुटुंबीयांसोबत अकोट येथे लग्नसमारंभासाठी गेले असल्याने दोन दिवस त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी ही संधी साधून बेडरूममधील कपाट फोडून साडेतीन किलो चांदी, 40 हजार रोख, दोन सोनसाखळ्या, तीन अंगठय़ा व अन्य दागिने आणि दुचाकी (एमझेडआर 8526) असा एकूण चार लाख 11 हजारांचा ऐवज लंपास केला.

सोमवारी लोमटे अकोटवरून परतले असता, त्यांना मागचा दरवाजा उघडा असल्याचे आढळले. मागील बाजूला लोखंडी टॉमी पडून होती. कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरीची माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम, बडनेराचे ठाणेदार ज्ञानेश्वर कडू यांच्या नेतृत्वात पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. नीलेश लोमटे यांच्या तक्रारीवरून बडनेरा ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी मध्यरात्री परिसरातीलच अन्य एक घर फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला. शहरात मागील दीड महिन्यांपासून घरफोड्यांचे सत्र सुरू असून, साईनगर परिसरातच एक दरोडाही पडला होता.