आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुडमध्ये दरोडा; सहा लाखांचा ऐवज लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड- टेंभूरखेडा मार्गावरील साईसंगम कॉलनी आणि विजयनगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी चार घरांमध्ये दरोडा घातला. त्यांचा प्रतिकार करणार्‍या दोघांना जखमी करण्यात आले. चोरट्यांनी 191 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 25 हजारांची रोकड घेऊन पळ काढला. या टोळीतील सहापैकी एका दरोडेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

साईसंगम कॉलनीत गुरुवारी मध्यरात्री जनार्दन रामटेके यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून दरोडेखोर घुसले. रामटेके यांच्या खिशातील पाच हजार रुपये आणि पत्नीच्या गळ्यातील 27 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी मिळवले आणि सर्वांना स्वयंपाकखोलीत डांबून ते पसार झाले.

दरोडेखोरांनी येथून विजय पोफळे यांच्या घराकडे मोर्चा वळवला. पोफळे यांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी त्यांच्या डोक्यावर बॅटने प्रहार केला. पोफळे यांच्या पत्नीकडून चाब्या घेऊन कपाटातील 43 ग्रॅमचे मंगळसूत्र, 20 ग्रॅम आणि 21 ग्रॅम वजनाची सोनसाखळी, कर्णफुले, अंगठी असे एकूण 101 ग्रॅमचे दागिने आणि 20 हजारांची रोकड लंपास केली. त्यानंतर विजयनगरमधील प्रमोद नारायण बहुरूपी यांच्या घरातील 58 ग्रॅम सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी लंपास केले. त्यानंतर त्याच परिसरातील चरणदास मारोतराव कडू यांच्या घरातून पाच ग्रॅम सोने पळवले. कडू यांच्या मुलाने प्रतिकार केला असता, त्यालाही मारहाण करण्यात आली. माहीती मिळताच वरुडचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. या प्रकरणी जनार्दन रामटेके यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

एकाला अटक, 145 ग्रॅम सोने जप्त
घटनेनंतर वरुड पोलिसांनी प्रेमसिंह डोंगरसिंह अलावा (35 रा. काकडवा ता. कुकशी जि. धार, मध्यप्रदेश) याला अटक केली. त्याच्याकडून 145 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सागर पाटील यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक किरण वानखडे, वरुडचे सहायक निरीक्षक बमनोटे, विजय निमकांडे, उमेश गारोडी, सुधाकर सोळंके, सुभाष दाभेराव, अरुण मेटे, मूलचंद भांबूरकर, त्र्यंबक मनोहरे, सुनील महात्मे, ज्ञानेश्वर सहारे, दिनेश राठोड, शकील चव्हाण, सचिन मिश्रा यांनी केली.