आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉक बँडच्या त्रिवेणी संगमाने तरुणाईला केले ‘क्रेझी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-अस्सल मराठी गीतांचा तडका, इंद्रधनुषी प्रकाशयोजना, सप्तरंगांची उधळण, रॉक बँडच्या तालावर सादर होणार्‍या गीतांवर तरुणाईच्या पडणार्‍या टाळ्या, प्रचंड उत्साह, जोश अन् जल्लोषाने विद्याभारती महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवारी (दि. 1) रात्री त्रिवेणी रॉक बँड शो ‘जोश’ कार्यक्रमाने तरुणाईच्या हृदयाचा ठाव घेत जबर्दस्त जोश भरला.
उच्च दर्जाची ध्वनिव्यवस्था व लेझर शोसह सुमधुर लोकप्रिय गाण्यांच्या आनंदाची पर्वणीसाठी संपूर्ण प्रांगण युवक-युवतींनी तुडुंब भरून गेले होते. मराठी रॉक बँड अस्मि, मुलींचा रॉक बँड क्रेझी बीट्स तसेच हिंदी गाण्यांचा जियाना रॉक बँडच्या त्रिवेणी संगमाने प्रांगणावरील तरुणाई अक्षरश: ‘क्रेझी’ झाली .एकाहून एक दज्रेदार गीतांचे सादरीकरण करीत कलावंतांनीही तब्बल चार तास प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शहरात पहिल्यांदाच आयोजित लाइव्ह रॉक बँड शोमधील कलावंतांचे सादरीकरण तसेच बँडचा थरार शहरातील तरुणाईने शनिवारी प्रत्यक्ष अनुभवला.
प्रारंभी ‘अस्मि’ मराठी रॉक बँडने मंचावर धूम करून सर्वांचीच वाहवा मिळवली. ‘पाठीवर फिरावा हलका तुझा गं हात..आई तुझी गं आई’ गाण्याने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गाण्याला तरुणाईने भरभरून प्रतिसाद दिला. एकसे एक स्वत: कंपोज केलेली गाणे गात अस्मि ग्रुपने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. अस्मि ग्रुपचा जल्लोष होत नाही, तोच क्रेझी बिट्स मुलींच्या रॉक बँड ग्रुपने तर मंचावर ‘कहर’च केला. महाराष्ट्रातील पहिला मुलींचा रॉक बँड शो ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवता आल्याने तरुणाईत नवचैतन्याचे वातावरण होते. हिंदी गाण्यांवरील जियाना रॉक बँडने अनेकांच्या हृदयांचा ठाव घेतला.
सायंकाळी साडेपाच वाजतापासून सुरू झालेल्या कार्यक्रमात मंदिराच्या दिशेने भक्तांचे पावले वळते होईल, तसे तरुणाईचे पाय रॉक बँड शो कार्यक्रमाकडे वळत होती. साधारणत: दुपारपासूनच तरुणाईने संपूर्ण मैदान फुलून गेले होते. सूर्यास्तानंतर तर मुंगीलाही मार्ग काढायला अडचण जाईल, अशी गर्दी होती. जिथे जागा मिळेल तेथून तरुणाईने कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
निमित्त होते जगत फाउंडेशन व विद्याभारती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अमरावती एनएसयूआय यांच्या सहकार्याने जोश रॉक बँड शो कार्यक्रमाचे. कार्यक्रमावर तरुणाईच्या अक्षरशा उड्या पडल्या.