आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RPI Leader Dr. Rajendra Gavai, Latest News In Divya Marathi,

रिपाइंचा वापर केल्यास न्यायालयात जाणार- डॉ. गवई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस वा राणा दाम्पत्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नावाचा वापर केल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी मंगळवारी दिला. रिपाइंकडून अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी आपली उमेदवारीही या वेळी जाहीर केली.
नवनीत राणा यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही डॉ. राजेंद्र गवई हे सोबत असल्याचे विधान आमदार रवि राणा यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रपरिषदेत केले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. गवई यांनी रिपाइंच्या नावाचा वापर न करण्याचा सज्जड इशारा पत्रपरिषदेत दिला. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली, त्याच वेळी रिपाइं आणि राष्ट्रवादीची परंपरागत युती तुटली, असे डॉ. गवई यांनी जाहीर केले. डॉ. गवई म्हणाले, की रवि राणा यांच्याकडून माझ्याबाबत वारंवार मित्र असल्याचा उल्लेख केला जातोय. हे चुकीचे आहे. मी राणा यांचा मित्र असलो, तरी लोकसभा निवडणूक होईपर्यंत त्यांनी मित्रत्व विसरावे आणि रिपाइंशी लढत द्यावी. राणा यांना रिपाइंकडून कोणतेही सहकार्य मिळणार नाही. तथापि, आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नवनीत राणा यांच्याशी नव्हे, तर शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्याशी आपली लढत असल्याचे गवई यांनी या प्रसंगी स्पष्ट केले. डॉ. गवई यांच्या पत्रकार परिषदेला रामेश्वर अभ्यंकर,भाऊसाहेब ढंगारे, भैयासाहेब गवई, भूषण बनसोड, मिलिंद तायडे, शंकर प्रधान, सविता भटकर, रमेश आठवले उपस्थित होते.
डॉ. गवई नाराज नाहीत
डॉ. राजेंद्र गवई आणि त्यांच्या कुटुबांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. गवई यांची नाराजी माझ्याप्रति नाही. त्यांच्या नावाचा उपयोग करू नये, हे त्यांचे म्हणणे अगदी योग्य आहे. यात कोणतेही दुमत नाही. रवि राणा, आमदार, युवा स्वाभिमान संघटना.
वाजपेयी आणि दादासाहेब गवई हेही मित्रच आहेत
माजी पंतप्रधान भाजपचे अटलबिहारी वाजपेयी आणि रिपाइंचे संस्थापक तथा माजी राज्यपाल दादासाहेब गवई हे दोघेही चांगले मित्र आहेत. वेगवेगळ्या पक्षांचे नेते असतानाही नवी दिल्ली येथे त्यांचा घरोबा होता. आजही या दोघांमधील मैत्रीचे संबंध कायम आहेत. मात्र, या दोघांनी त्यांच्या मित्रत्वाचा वापर एकमेकांविरोधात राजकारणात केला नाही, असे गवई यांनी स्पष्ट केले.