आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RPI News In Marathi, Gawai Group, Nationalist Congress

राष्ट्रवादीविरोधात रिपाइंच्या गवई गट लोकसभेच्या 20 जागा लढवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - रिपाइंचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी मंगळवारी अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवारीची घोषणा केली. राष्ट्रवादीने रिपाइंला तिकीट नाकारून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा अपमान केला, असा आरोपही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीसाठी 20 मतदारसंघांत राष्ट्रवादीविरोधात रिपाइंचे उमेदवार उभे करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला.


गवई गटाच्या रिपाइंतर्फे उत्तर मुंबईतून राकेश शेट्टी आणि गुलाम हुसैन यांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल. तर दक्षिण मुंबईतून आनंद खरात हे उमेदवार असतील, असे डॉ. गवई यांनी जाहीर केले.

राष्ट्रवादीचे निरीक्षक अनिल देशमुख अणि प्रकाश डहाके सात जानेवारीला माझ्या घरी आले होते. ‘घड्याळ’ चिन्हावर नव्हे, रिपाइंच्या चिन्हावरच लढणार असल्याचे त्यावेळीच त्यांना स्पष्ट केले होते. रिपब्लिकन जनतेने टाकलेला विश्वास मोडायचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सोडायचा नसल्याने राष्ट्रवादीचे चिन्ह स्वीकारले नाही, अन्यथा आपण सहज खासदार होऊ शकलो असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या दोन पोटनिवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने माझा फोटो लावून निवडणूक प्रचार केला. तेव्हा मी त्यांना चालत होतो, आता का नाही, असा सवाल गवई यांनी केला.

शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर नवनीत राणांना दिलेली उमेदवारी बदलवू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. कोणत्याही परिस्थितीत निर्णयावर फेरविचार करणार नाही. आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडी प्रसंगी विचार करण्यात येईल, असे पवारांनी सांगितले. अमरावती लोकसभेतून निवडणूक लढवणार असल्याचे आपण पवारांना तेव्हाच स्पष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.


‘भारिप’ला मागणार पाठिंबा
भारिप-बहुजन महासंघाचे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे डॉ. गवई यांनी सांगितले. अमरावती मतदारसंघातून उमेदवार उभा न करता त्यांनी मला आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती करणार आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच त्यांनी स्थापन केलेल्या 18 पक्षांच्या महाराष्ट्र आघाडीत सामील व्हायचे की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे गवई म्हणाले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.