आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोले तैसा चाले... गडचिरोलीच्या पालकत्वाचे आव्हान आबांनी पेलले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपुरातील गुलाबी थंडीत विधानभवनात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गरमागरम चर्चा सुरू होती. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने ते वर्ष (२००९) आजवरचे सर्वाधिक हिंसाचाराचे वर्ष ठरल्याने गृहमंत्री आबा विरोधकांचे प्रमुख लक्ष्य होते.
विरोधी पक्षांच्या टीकेचा सामना करणारे आबा एकटेच खिंड लढवत होते. गडचिरोली जिल्ह्यातील रक्तपाताचे चित्र आक्रमकपणे सभागृहात मांडताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना गडचिरोलीचे पालकमंत्री होण्याचे आव्हान दिले. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता आबांनी ते तत्काळ स्वीकारत विरोधी पक्षाच्या नेत्यांची बोलती बंद केली. विशेष म्हणजे त्यानंतर सलग पाच वर्षे आबांनी गडचिरोलीचे पालकत्व प्रभावीपणे सांभाळले.
गडचिरोलीत २००९ मध्ये नक्षलवादी हल्ल्यात ५२ पोलिस शहीद झाले होते. अनेक नागरिकांनाही नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले. गडचिरोलीत नक्षली हिंसाचाराचा आगडोंब उसळला असताना १४ डिसेंबर २००९ रोजी हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री या नात्याने उत्तर देण्याची वेळ आर. आर. पाटील यांच्यावर आली होती. गडचिरोलीतील परिस्थितीकडे लक्ष वेधून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था संपुष्टात आल्याची टीका करून आबांना लक्ष्य केले.

सरकारच्या वतीने आबा जवळपास एकटेच सभागृहात खिंड लढवत होते. नक्षलवाद्यांच्या गोळीला गोळीनेच उत्तर देण्याचे पोलिसांचे धोरण असून राज्य सरकार ठामपणे पोलिसांच्या पाठीशी असल्याचे गृहमंत्री आबा सांगत होते. विरोधी पक्षाचे नेते त्यांचे काहीही ऐकून न घेता त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत होते. आबांच्या कार्यशैलीवर टीका करताना ‘तुम्ही गडचिरोलीचेच पालकमंत्री व्हा’, असे आव्हान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना दिले. आबा यांनी लगेच ते आव्हान स्वीकारले. मुख्यमंत्र्यांकडे आपण गडचिरोलीच्या जबाबदारीची मागणी करू, अशी घोषणाही त्यांनी लगेच करून टाकली तेव्हा विरोधकांची तोंडे बंद झाली.

जीव धोक्यात घालून प्रवास
नक्षली हिंसाचाराने ग्रस्त जनता आणि पोलिसांमध्ये सुरक्षेबद्दल आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी आबांनी गृहमंत्री असताना मोठा धोका पत्करला. गडचिरोली येथून कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून आबांनी नक्षल्यांचा गड असलेल्या धानोरा तालुक्यातील दुर्गम गावाला भेट दिली. त्या वेळी त्यांच्यासोबत सावलीपणे वावरलेल्या पोलिस कर्मचारी तो प्रसंग अभिमानाने सांगतात. नक्षलग्रस्त भागात पोलिसांचा फौजफाटा दुपटीने वाढविण्याबरोबरच आबांनी त्यांना अत्याधुनिक शस्त्रेही दिली.

विकासकामांचा धडाका, अादिवासींना राेजगार
एक जानेवारी २०१० रोजी आबांकडे गडचिरोलीचे पालकत्व आले. हिंसाचाराने ग्रस्त जिल्ह्यातील जनतेच्या त्यांच्या व्यथांची दखल घेणारा प्रतिनिधी मिळाला. गडचिरोलीच्या विकासासाठी विशेष प्रयत्न झाले. ४१ हजारांवर दुर्गम भागात वीज पोहोचवण्याचा निर्णय, १५ कोटींचे महिला रुग्णालय, गोंडवन विद्यापीठ स्थापना, १८ आयटीआय इमारतींचे जाळे, २२ वसतिगृहांचे बांधकाम, मुलांसाठी महाराष्ट्र दर्शन उपक्रम, नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना तसेच खासगी कंपन्यांशी संपर्क साधून आदिवासींच्या रोजगाराची सोय लावण्यात आबांनी मोलाचे योगदान दिले आहे.