आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगल्यात गोड पाण्याचा पाझर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आरटीओ कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या परांजपे कॉलनीत एका बंगल्यात गोड पाण्याचा पाझर लागला. मागली तीन महिन्यांपासून एकदाही न आटलेल्या पाझराला सोमवारी पाणी वाढले. त्यामुळे नागरिकांनीही उत्सुकतेपोटी बंगल्यात गर्दी केली होती. कापड व्यावसायिक रौनक लोटिया यांच्या घराच्या व्हरांड्याखालील भिंतीमधून मागील तीन महिन्यांपासून थोड्या प्रमाणात पाणी येत होते. पाण्याच्या उगमाचा शोध घेण्यासाठी त्यांनी भिंत फोडल्यावर प्रवाह वाढला. ते पाणी चवीला गोड आहे. तथापि, ते नेमके कोठून येत आहे, याचा अद्याप शोध लागला नव्हता. छडा लावण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले. कर्मचार्‍यांनी पाझराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते यशस्वी ठरले नाहीत. त्या वाहत्या पाण्याचे नमुने मात्र त्यांनी घेतले. ते तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. या घराच्या जागेवर काही वर्षांपूर्वी अन्य वास्तूसाठी नळ कनेक्शन असेल. कदाचित त्याच कनेक्शनमधून हा पाझर येत असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पाझराला पाणी वाढल्याची वार्ता कानी पडताच नागरिकांचेही औत्सुक्य चाळवले गेले. त्यामुळे सोमवारी सकाळी नागरिकांनी हे बघण्यासाठी बंगल्यात गर्दी केली होती.