आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjay Khodke News In Marathi, Sharad Pawar, Divya Marathi

प्रचारात जे बोलावे लागते, तेच बोलले पवारसाहेब, खोडके यांची स्पष्‍टोक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - निवडणूक काळात जसे बोलावे लागते, तसेच शरद पवार बोलले. त्यात वावगे वाटण्याचे कारण नाही, अशी रोखठोक भूमिका वर्‍हाड विचार मंचचे संजय खोडके यांनी मांडली. पक्ष कोणताही असो, मी अजूनही पवार यांनाच दैवत मानतो, असे स्पष्ट मत खोडके यांनी व्यक्त केले.


बहुजन समाज पक्षाचे उमेदवार गुणवंत देवपारे यांना पाठिंबा दिल्यानंतर खोडके यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये माझ्यासाठी कोणतेही स्थान नाही, हे पवारांचे बोलणे योग्यच आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी मी जो निर्णय घेतला, तो माझ्याऐवजी कुणीही घेतला असता, तर त्यांना हेच बोलावे लागले असते. त्यामुळे त्या निर्णयाबाबत फारसे मनाला लावून घेण्यासारखे नाही. प्रचाराच्या काळात जसे बोलावे लागते, नेमके तसेच ते बोलले आहेत. उलट पवारांसारख्या बड्या नेत्याला गळ घालून अमरावतीत मुक्कामी ठेवणे यातून त्या पक्षाची नाचक्कीच दिसून येत आहे. मनपा नगरसेवकांच्या वैधतेवरून उठलेल्या वादळाबाबत बोलणे टाळताना, राष्ट्रवादीला लोकसभेची नव्हे तर मनपाचीच निवडणूक लढायची आहे असे दिसते, असा टोलाही खोडके यांनी लगावला. याउलट आपले लोकसभा निवडणुकीवर लक्ष असून, गुणवंत देवपारे हेच मुख्य लढतीत आहेत, यावर त्यांनी जोर दिला.
मतदारसंघातील निरीक्षणे नोंदवताना दलित, मुस्लिम मते देवपारे यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले. दलितांमधील शिक्षित घटक हा इतर कुणासोबत नसून, तो देवपारे यांनाच अधिक मानतो. शिवाय बीएसपीचे दूरवर पसरलेले जाळे आणि मुस्लिम मतांची साथ निश्चितच विजयाकडे घेऊन जाईल, अशी मांडणी खोडके यांनी पत्रपरिषदेत केली. अजित पवारांनी ज्या शब्दांत माझा उद्धार केला, पक्षातून बाहेर करताना जी भाषा वापरली, त्यामुळे मराठा समाज दुखावला असून, त्याचा फायदाही देवपारेंनाच होणार, असेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले.


मुख्यमंत्री का आले नाहीत?
आमदार या नात्याने रवि राणा काँग्रेसच्या जवळचे आहेत. पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांशीही त्यांचे जवळचे संबंध आहेत. परंतु, अमरावतीच्या अवती-भोवती प्रचारासाठी फिरणार्‍या मुख्यमंत्र्यांनी अमरावतीकडे पाठ फिरवली. काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही तसेच केले. याचाच अर्थ उमेदवाराच्या वैधतेबाबत ज्या अडचणी आहेत, त्या त्यांना माहीत आहेत व ते त्या घोटाळ्यात सहभागी होऊ इच्छित नाहीत, असेही खोडके म्हणाले.