आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवाढ प्रकरणी आणखी ३९ उत्तरपत्रिका संशयित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गुणवाढप्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी सूचवलेल्या आणखी सात विद्यार्थ्यांच्या ३९ उत्तरपत्रिका संशयाच्या भोवर्‍यात सापडल्या असून, त्या पडताळणीसाठी १२ मे रोजी होणार्‍या ३२.६ समितीसमोर ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे या उत्तरपत्रिकांमधील गुणवाढीची सत्यता ही याच दिवशी उघड होणार आहे.

विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणात पोलिसांना तपासादरम्यान अभियांत्रिकीच्या सात विद्यार्थ्यांची नावे पुढे आली होती. त्यामुळे सदर सात विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका काढून त्याची तपासणी करण्याबाबत पोलिसांनी बारा दिवसांपुर्वी विद्यापीठाला पत्र दिले होते. याच पत्रावरून विद्यापीठाने सात विद्यार्थ्यांच्या ३९ उत्तरपत्रिका बाहेर काढल्या असून, त्या १२ मे रोजी होणार्‍या ३२.६ समितीसमोर त्या तपासणीसाठी ठेवल्या जाणार आहेत.

विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणात परीक्षा नियंत्रक डॉ. जे. डी. वडते यांनी तक्रार नोंदवली होती. तक्रारीवरून पोलिसांनी २१ फेब्रुवारी २०१५ रोजी नऊ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला असता दरदिवशी धक्कादायक माहिती पुढे येत होती. त्यामुळे पोलिसांनी विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या दोन लाखांवर उत्तरपत्रिका तपासणीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पोलिसांनी आपले मनुष्यबळ वापरून १३ १६ एप्रिलला जवळपास अठरा हजार उत्तरपत्रिकांची पाहणी केली. मात्र, नंतर पोलिसांनी उर्वरित उत्तरपत्रिका तपासणीसाठी विद्यापीठाला सांगितले. त्या संदर्भात पत्रसुध्दा दिले होते. दुसरीकडे पोलिसांनी अटक केलेले आरोपी कोठडीत होते. त्यांच्याकडून पोलिसांना गुणवाढ प्रकरणात आणखी काही नवीन विद्यार्थ्यांची नावे पुढे आली होती. त्या विद्यार्थ्यांनी गुणवाढ केली किंवा नाही, हे ठरविण्यासाठी त्यांच्या उत्तरपत्रिका तपासणे गरजेचे आहे. म्हणून फ्रेजरपुरा पोलिसांनी परीक्षा नियंत्रकांना २३ एप्रिलला पत्र देवून चार मुलांची २४ एप्रिलला पत्र देऊन आणखी तीन असे एकूण सात मुंलाचे नाव सांगितले. सदर विद्यार्थ्यांच्या हिवाळी २०१४ च्या उत्तरपत्रिका काढून त्याची तपासणी करावयास सांगितले. त्यानुसार विद्यापीठाने तातडीने त्या सात विद्यार्थ्यांच्या ३९ उत्तरपत्रिका बाहेर काढल्या.

गुणवाढ प्रकरणातील संशयित उत्तरपत्रिका असल्यास त्याची तपासणी ३२.६ समितीकडून केली जाते. त्यामुळेच मे रोजी आयोजित समितीच्या बैठकीत या उत्तरपत्रिका ठेवायच्या होत्या मात्र त्या दिवशीची ३२.६ ची बैठक स्थगित झाली. हीच बैठक आता १२ मे रोजी होणार असून, या दिवशी सर्व ३९ संशयित उत्तरपत्रिका समितीसमोर ठेवल्या जाणार आहेत. समितीमधील तज्ज्ञांकडून या ३९ उत्तरपत्रिकांची तपासणी होणार असल्याची माहिती विद्यापीठातील विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी विद्यापीठाला दिलेल्या सात विद्यार्थ्यांच्या यादीत दोन विद्यार्थी हे एम. ई.चे असून, त्यांच्यासुद्धा उत्तरपत्रिका वेगळ्या काढून ठेवल्या आहेत.

गुणवाढप्रकरणात विद्यापीठाची भूमिका
गुणवाढप्रकरणात सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे, अशी अपेक्षा विद्यापीठाचीच आहे. हे प्रकरण परीक्षा विभागानेच बाहेर काढले, पोलिसांत तक्रारसुध्दा आम्हीच केली आहे. इतकेच नाहीतर पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात जी काही मदत मागितली, सहकार्य मागितले ते आम्ही वेळोवेळी दिले आहे पुढेही देणारच आहोत. पोलिसांनी गोपनिय विभागात उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परवानगी मागितली आम्ही दिली. त्यांनी उत्तरपत्रिका सुध्दा तपासल्या. १३ उत्तरपत्रिका संशयित आढळल्या होत्या.

उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय समिती
गुणवाढ प्रकरण पुढे आल्यानंतर अभियांत्रीकीच्या दोन लाखांवर उत्तरपत्रिका तपासण्याचा निर्णय पोलिसांनी घेवून जवळपास १८ ते वीस हजार उत्तरपत्रिका तपासल्या. उर्वरीत तपासणीसाठी आम्हाला सांगितल्या त्यामुळे आम्ही उत्तरपत्रिका तपासणीसाठी नव्याने त्रिसदस्यीस समिती स्थापण केली आहे. ही त्रिसदस्याय समिती उर्वरीत उत्तरपत्रिका तपासणी करत आहे. त्यांची तपासणी झाल्यावर आम्ही कळवणार असल्याचे परीक्षा नियंत्रकांनी सांगितले.

सहकार्य केले, पुढेही करणार
विद्यापीठातील गुणवाढ प्रकरण आमच्यामुळेच बाहेर आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात आतापर्यंत आम्ही सहकार्य केले आहे. यापुढील काळातही ते करतच राहणार आहे. कारण ठराविक विद्यार्थ्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको, जे दोषी असतील त्यांना शिक्षा मिळायला पाहीजे. त्यासाठी आम्ही पोलिसांना वेळोवेळी आवश्यक ती माहीती पुरवली आहे यापुढेही देणार आहोत. प्रा.डॉ. जे. डी. वडते, परीक्षा नियंत्रक, विद्यापीठ.

..तर पोलिस तपासणार उत्तरपत्रिका
दोन दिवस उत्तरपत्रिकांची तपासणी केल्यानंतर उर्वरीत उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आम्ही विद्यापीठाला पत्र दिले. मात्र किती उत्तरपत्रिका तपासल्या, त्यामध्ये काही संशयित आढळल्या आहे का? अशी माहीती गुरूवारपर्यंत (दि.७) आम्हाला विद्यापीठाकडून मिळाली नाही. आम्ही पुन्हा एकदा या संदर्भात पत्र देणार आहेत. अन्यथा दोन दिवस ज्या प्रमाणे आम्ही स्वत: उत्तरपत्रिका तपासल्या त्याच प्रमाणे आम्ही उर्वरित उत्तरपत्रिका तपासणी करू. मात्र काही दिवस विद्यापीठाची आम्ही प्रतिक्षा करणार आहे. देवराजखंडेराव, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा.

पुढे काय?
१२मे रोजी होणार्‍या ३२.६ समितीसमोर या ३९ उत्तरपत्रिका तपासणीसाठी जाणार आहे. यामध्ये काही संशयास्पद आढळल्यास विद्यापीठ ती माहीती पोलिसांना देईल संबधितावर पोलिसांकडून कारवाई होईल. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी १६ जणांना अटक केली आहे. यामध्ये तीन कंत्राटी सहायक मुल्यांकन अधिकारी, आठ विद्यार्थी आजी, माजी कंत्राटी कर्मचार्‍यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...