आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन सेव्ह वॉटर: पाण्याचा सुकाळ बनू नये कधीच दुष्काळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - दुचाकी किंवा चारचाकी वाहनाच्या टाकीत इंधन आहे म्हणून कुणी 24 तास ते सुरू ठेवत नाही, तसेच अप्पर वर्धा धरणात मुबलक जलसाठा आहे म्हणून विनाकारण पाण्याची नासाडी करणं योग्य नाही. अशी कृती कुणी करत असेल, तर ते चूकच आहे.


अशा प्रतिक्रिया अमरावतीकरांनी व्यक्त केल्या आहेत. पाण्याची नासाडी, वायुप्रदूषण, जलप्रदूषण, भूमी प्रदूषणासारखे विषय दूरगामी दुष्परिणाम करणारे आहेत. त्यामुळे आहे त्या पाण्याची बचत करा, पाण्याची नासाडी करू नका, या दै.‘दिव्य मराठी’च्या ‘मिशन सेव्ह वॉटर’च्या संकल्पाला सुजाण अमरावतीकरांनी आपापल्या पद्धतीने साथ दिली आहे.


सतत वाहने धुणे केले बंद
आम्ही मित्र अमरावतीत रूम करून राहतो. पूर्वी आम्ही दररोज दुचाकी धुवायचो. त्यासाठी नळ आल्यावर पाइपने पाणी मारायचो. आता लक्षात आलं, की जास्त पाणी वाया जातेय. त्यामुळे दररोज वाहने धुणे बंद केले.
महेश पुरी, राजेंद्र कॉलनी

नळावाटेचा अपव्यय रोखणार
जे नळ विनाकारण सुरू दिसतील, ते आम्ही बंद करणार आहोत. जेवढे गरजेचे असेल, तेवढय़ाच पाण्याचा वापर आम्ही सुरू केला आहे. लोकांनी आपापल्या परीने इतके जरी केले, तरी मोठय़ा प्रमाणावर पाण्याची बचत होईल. पूजा लक्ष्मणराव खडके, अंगदनगर, शेगाव नाका


वापरातील पाणी झाडांना
मोटार सुरू करून किंवा पाइपने झाडाला पाणी टाकणे बंद केले आहे. घरातील इतर कामांसाठी वापरलेले पाणी झाडांना घालत आहे. सर्वांनी याच पद्धतीने वापर सुरू केला, तर शुद्ध पाण्याची बचत करता येईल.
डॉ. मनीषा इथापे-जाधव, संजीवनी कॉलनी, राठीनगर


सतत पाणी नको
सततचा पाणीपुरवठा असेल, तर लोक त्याबद्दल बिनधास्त होतात. धरण पाण्याने भरले आहे. पण, सुकाळ आहे म्हणून चालू द्या पाण्याची नासाडी, हे स्वीकार्य नाही. तीनच दिवस पाणीपुरवठा व्हावा.
प्रदीप बोंडे, देसाई ले-आउट, गणेश कॉलनी,


नळाला व्हॉल्व्ह बसावा
घरांवर पाण्याच्या टाक्या असतात. त्या भरल्यानंतर नळ सुरूच असतो. आम्ही मात्र टाकीच्या नळाला व्हॉल्व्ह बसवला आहे. त्यामुळे टाकी भरली, की नळ आपोआप बंद होतो. शिवाय दुचाकी, चारचाकीवर मोटरने पाणी मारणे बंद केलेय. आपणही हे करा.
विशाल यावले, दस्तुरनगर