आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचा एकही थेंब वाया जाता कामा नये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अप्पर वर्धा धरणातून मुबलक पाणी उपलब्ध असल्याने अमरावतीकरांना अजूनपर्यंत पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवले नाही. तथापि, पाणी बचतीचा मंत्र आजच अंमलात आला नाही, तर मराठवाड्याप्रमाणे येथेही टंचाईची झळ बसल्याशिवाय राहणार नाही.

‘वर्षभर चोवीस तास पाणी’ ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबवली जाणार आहे. त्यादृष्टीने विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. घरावरील टाकी भरल्यानंतरदेखील नळ बंद करण्याकडे दुर्लक्ष केल्याने कित्येक लिटर पाण्याची दररोज नासाडी होते. फुटलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती न केल्याने पाणी रस्त्यांवरून वाहते.

जल है तो कल है !
सिमेंट क्राँक्रीटच्या जंगलातील अपार्टमेंटरूपी इमारतीमध्ये दाटीवाटीने राहणार्‍या शहरी माणसांकडूनच पाण्याचा सर्वाधिक अपव्यय होताना दिसतो. आधुनिक जीवनशैलीमुळे शहरालगतची धरणे कोरडी पडत आहेत, तर भूजलसाठा झपाट्याने खालावत आहे. भविष्यातील गहिरे जलसंकट ओळखून प्रत्येकाने वेळीच पाण्याचे महत्त्व जाणले पाहिजे; अन्यथा घोटभर पाण्यासाठी मोटभर पैसे मोजावे लागतील. हे संभाव्य संकट ओळखून दै. ‘दिव्य मराठी’ने चालवलेल्या ‘मिशन सेव्ह वॉटर’ ला (पाणी वाचवा अभियान) नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचा निर्धार अनेकांनी केला आहे. बहुतेक सजग नागरिकांनी पाणी बचतीसाठी अनेक उपाययोजना केल्या असून, इतरांनाही त्या दिशादर्शक ठरतील. याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत..

पाणी वाचवण्याची ती सवय अजूनही कायम
यवतमाळ येथे अत्यल्प पाणीपुरवठा असायचा. आठ दिवसांतून तो व्हायचा. त्यामुळे पाण्याचे महत्त्व मी जाणते. मी केवळ ड्रमभर पाण्यात दिवस काढले आहेत. म्हणूनच पाणी वाचवण्याची सवय आतादेखील कायम आहे. पिण्याचे पाणी शिळे म्हणून न फेकता ते झाडांना टाकते. घरातील सदस्य तसेच पाहुण्यांनादेखील पाण्याचा किमान वापर करण्यास सांगते.
मीना शहा

स्वयंपाकगृहातील पाणी सोडते झाडांना
भाजीपाला तसेच तांदूळ धुण्यासाठी लागणार्‍या पाण्याचा उपयोग झाडांना देते. स्वयंपाकगृहातील भांडे धुण्याच्या ठिकाणी असलेले पाणीही पाइपच्या सहाय्याने झाडांना जाते. तशी व्यवस्था केली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी काम करत असल्याने पर्यावरणासोबतच पाण्याची बचत करते. कुठल्याही प्रकारे पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेते.
पूजा उमेकर, फेथ फाउंडेशन

स्वत:पासूनच करावी बचतीची सुरुवात
पाण्याचा अपव्यय वाढत असल्याने भूजलसाठा कमी होत आहे. प्रत्येकानेच पाणीबचतीची स्वत:पासून सुरुवात करावी. पाण्याची वेळ ठरली असून, त्यादरम्यानच नळ सुरू करते. छतावर साफसफाई करून साठवलेले पाणी पाइपच्या साहाय्याने विहिरीत सोडण्यात येते. त्यामुळे पाण्याची चणचण कधीच जाणवत नसल्याचे वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या सचिव पालकर यांनी सांगितले.
प्राची पालकर