आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेचे गेट पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर - माध्यान्ह सुटीमध्ये शाळेच्या प्रांगणामध्ये खेळत असताना नव्याने बांधण्यात येत असलेले शाळेचे गेट अंगावर पडल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. दर्यापूर नगरपरिषद क्रमांक तीनच्या डॉ. अल्लाम इकबाल नगर परिषद उर्दू प्रायमरी मुलींच्या शाळेमध्ये गुरुवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. सानिया तबस्सुम शेख उमर (9) असे मृतक मुलीचे नाव आहे. ती इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होती.

सानिया आपल्या मैत्रिणींबरोबर शाळेच्या प्रांगणामध्ये खेळत होती. दरम्यान, शाळेचे नव्याने बांधण्यात येत असलेल्या गेटजवळ पोहोचताच तिच्या अंगावर ते कोसळले. यात डोके, कान आणि छातीला मार लागून ती गंभीर जखमी झाली. दरम्यान, घटनेवेळी शिक्षक तेथे उपस्थित नसल्यामुळे ती काही वेळ गेटखाली दबून राहिली, असे समजते. घटनेची माहिती मिळताच काही नागरिकांनी सानियाला दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मुख्याध्यापक मो. हनिफ शल्लोद्दीन पटेल आणि शिक्षकही तातडीने रुग्णालयात पोहोचले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अमरावती येथे हलवण्यात येत असताना वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. नगर परिषद उपाध्यक्ष शाहदत खाँ पठाण, नगरसेवक शिवाजी देशमुख, असलम घाणीवाले, बळवंत वानखडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतक मुलीचे वडील शेख उमर शेख रशीद यांनी दर्यापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, नगर परिषद व शाळा प्रशासनाविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. नगरपालिका, शाळा प्रशासनाविरोधात कारवाई करण्यासाठी दर्यापूर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. परंतु, वृत्त लिहिस्तोवर गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. मृत्यू अमरावतीच्या हद्दीत झाल्यामुळे कोतवाली पोलिसांच्या माहितीनंतर चौकशी करून गुन्हा नोंदवण्यात येईल, अशी माहिती दर्यापूर पोलिसांनी दिली आहे.
पडून होती मुलगी
शाळेच्या वॉलकम्पाउंडचे सुरू असलेल्या कामाचे लोखंडी गेट अंगावर पडल्यानंतर जवळपास दहा मिनिटे मुलगी गंभीर अवस्थेत गेटखाली पडून होती. या वेळेत शिक्षक उपस्थित असते, तर कदाचित मुलीवर तातडीने उपचार झाले असते, अशी चर्चा शहरवासींयामध्ये होती.
कायदेशीर कारवाईची मागणी
शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिपाई यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. घटना गंभीर आहे. शिवाजी देशमुख, बांधकाम सभापती, न. प., दर्यापूर.