आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Uniform Issue In Yavatmal School For 15 August

गणवेशअभावी विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन ‘कलरफूल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणार्‍या विद्यार्थ्यांना दोन गणवेश मंजूर आहेत. मात्र, काही तालुक्यांना गणवेशाचा निधी उशिरा प्राप्त झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना यंदाचा स्वातंत्र्यदिन रंगीबेरंगी गणवेशातच साजरा करावा लागणार आहे.

सर्वशिक्षा अभियानाने शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील आठ तालुक्यांना दोन कोटी रुपये वितरित केले. मात्र, उर्वरित तालुक्यांना निधीच शिल्लक राहिला नाही. विशेष म्हणजे यंदा हा निधी येण्यास उशीर झाला आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 6) तीन कोटी 72 लाख 60 हजार, 800 रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. गुरुवारी (दि. 7) उर्वरित आठ तालुक्यांना निधी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना यंदा एमपीएसपीकडूनच निधी प्राप्त होणार होता. आचारसंहिता असल्यामुळे सर्वशिक्षा अभियानाचे बजेट यंदा उशिरा मंजूर झाले. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश प्राप्त होऊ शकला नाही. जिल्ह्यातील आठ तालुक्यांना सर्वशिक्षा अभियानाच्या अखर्चीत निधी वितरीत करण्यात आला होता. यामध्ये वणी, मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा, कळंब, घाटंजी, आर्णी, राळेगाव तालुक्याला जवळपास दोन कोटी रुपये वाटप करण्यात आले होते. यातील उर्वरित तालुक्यांना निधीची प्रतीक्षा होती.

ही प्रतीक्षा बुधवारी संपली असून, यवतमाळ, बाभूळगाव, नेर, दिग्रस, दारव्हा, पुसद, उमरखेड, महागाव तालुक्यांसाठी तीन कोटी 72 लाख 60 हजार 800 रुपयांचा निधी सर्वशिक्षा अभियान विभागाला प्राप्त झाला आहे. गुरुवारी हा निधी उर्वरित आठ तालुक्यांना वितरित करण्यात येणार आहे. अवघ्या आठ दिवसांवर स्वातंत्र्यदिन असल्यामुळे गणवेश तयार करण्यासाठी वेळ मिळणार नाही. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन रंगीबेरंगी गणवेशावरच साजरा करण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांवर येऊन ठेपली आहे.
शिक्षणाधिकार्‍यांनी घेतली बीईओंची तातडीची बैठक
शैक्षणिक वर्षांला सुरुवात होऊन जवळपास दीड महिना लोटला; तरीसुद्धा गणवेशाचा निधी प्राप्त झाला नाही. शिक्षण विभागाकडून वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर बुधवारी (दि. 6) हा निधी प्राप्त झाला आहे. दरम्यान, शिक्षणाधिकारी सूचिता पाटेकर यांनी सोळाही गटशिक्षणाधिकार्‍यांची बैठक आपल्या कार्यालयात घेऊन गणवेशाचा हा निधी त्वरित शाळेला वितरित करण्याचे निर्देश दिले.
गणवेश आठ दिवसांत तयार होतील
4गणवेशाचा निधी येण्यासच उशीर झाला आहे. तत्पूर्वी आम्ही आठ तालुक्यांना सर्वशिक्षा अभियानाकडील संपूर्ण निधी वितरित केला होता. आता केवळ उर्वरित आठ तालुक्यांना निधी दिला जाणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही गटशिक्षणाधिकार्‍यांना सूचना दिल्या असून, हा निधीसुद्धा वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे आठ दिवसांत शंभर टक्के गणवेश तयार होऊन विद्यार्थी स्वातंत्र्यदिनाला उपस्थित राहतील. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ.
अखर्चित निधी मागवून घेतला होता
एमपीएसपीकडून निधी येण्यास उशीर होत असल्याचे पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्वशिक्षा अभियान प्रमुखांनी जिल्ह्यातील सोळाही गटशिक्षणाधिकार्‍यांकडून अखर्चीत निधी मागवून घेतला होता. त्या अनुषंगाने सोळाही गटशिक्षणाधिकार्‍यांना पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, त्यांनीसुद्धा अखर्चीत निधीची माहिती दिलीच नाही.