आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा द्या, महसूल घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सचिन खेडेकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी एकत्र जमलेले शहरातील केबल चालक. छाया: मनीष जगताप )
अमरावती - सुरक्षा दिल्यास मनोरंजन करातून जिल्हा प्रशासनाला चांगला महसूल गोळा करुन देऊ, असा विश्वास केबल चालकांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिला. मनोरंजन शुल्काबाबत अतिशय सक्तीचे धोरण शासन स्तरावरून अवलंबिले जात आहे. केबल शुल्क वसूल करण्यास गेलेल्या सचिन खेडेकर यांच्यावर विद्युत नगरात प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ केबल चालक मंगळवारी (दि.३०) जिल्हा कार्यालयावर धडकले होते.
गाडगे नगर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या विद्युत नगर येथे सचिन खेडेकर यांच्यावर चाकुने प्राणघातक हल्ला करण्यात आला. शिवाय बडनेरा पोलिस ठाण्याअंतर्गत निंभोरा येथे देखील सचिन गवारे या केबल दुरुस्ती कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात आली. याबाबत बडनेरा गाडगे नगर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मनोरंजन कराबाबत अतिशय सक्तीचे धोरण अवलंबिले जात असल्याने शुल्क जोडणीदाराकडून वसूल करणे आवश्यक आहे. मात्र बरेच जोडणीधारक शुल्क देताना अरेरावी, दादागिरी करतात, केबल ऑपरेटरला मारण्याचा धमक्या देतात. केबल वायर तोडतात, त्यांच्या घरावर हमले करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

शहरातील केबल ऑपरेटर यांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. केबल शुल्क भरणाऱ्या आडकाठी आणणाऱ्याविरुद्ध सरकारी कार्यात अडथळा निर्माण करण्याचा भादंवि ३५३ नुसार गुन्हा दाखल करावा. केबलचे मासिक शुल्क देणाऱ्या जोडणी धारकांचे कनेक्शन कापताना पोलिस संरक्षण देण्यात यावे. केबल चोरी किंवा तोडण्यात आला असेल तर तत्काळ गुन्हा दाखल करावा तसेच तोडणाऱ्याचा शोध घ्यावा. शहरात वाय-रिंग करताना महापालिकेने त्यांच्या मालकी इमारती इतर ठिकाणाहून वाय-रिंग करण्यास सहकार्य करावे. शंभर टक्के लोक मासिक शुल्क देत नसल्यामुळे मनोरंजन कर भरण्यामध्ये २५ ते ३० टक्के सुट देण्यात यावी.

शासनाचा कर ग्राहकाकडून ४५ रुपये प्रती टी.व्ही. वसूल करीत देत असून पूर्णपणे शासकीय तिजोरीत भरतो. सदर वसुलीवर २५ टक्के कमिशन देण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रेमचंद गुप्ता, प्रवीण घोरा, धीरज जयस्वाल, प्रवीण डांगे, विनोद देशपांडे, ओमप्रकाश शर्मा, भारत चव्हाण, प्रवीण नागपुरे, राहुल झटकर, सुधीर तेटू, देवानंद इचे, भास्कर वासेवाल, संजय चर्जन, सुनील मकवाने, सुमिता दहीकर, गजानन जोंधळेकर उपस्थित होते.
अटकाव केल्यास गुन्हा
केबलशुल्काची वसुली करीत असताना अडथळा निर्माण केल्यास नागरिकांवर आता भादंविच्या ३५३ कलमानुसार गुन्हा दाखल होणार आहे. केबलचा मासिक शुल्क देणाऱ्या नागरिकांची जोडणी बंद करताना पोलिस संरक्षण देखील देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले. यामुळे केबल वसुलीत वाढ होणार असल्याचे संकेत आहे. केबल ऑपरेटर्संना आता पोलिस संरक्षण मिळणार असल्याने कारवाईच्या दरम्यान त्यांना बळ मिळणार आहे.

अमरावती केबलकनेक्शन कापण्याच्या वादवरुन केबल ऑपरेटरवर जीवघेणा चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेत सचिन खेडेकर यांच्या मांडीवर गंभीर दुखापत झाली असून त्याला वेळीच उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दितील वलगांव रोडवरील माऊली बिछायत केंद्र येथे ही घटना घडली. राजू वानखडे या आरोपीने हा चाकूहल्ला केला असून तो घटनेनंतर फरार आहे.
याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी वीरेंद्र सदाशिव थरडक (३३, मेघे ले-आऊट) यांच्या तक्रारीवरुन आरोपी राजू वानखडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राजू याचे मागील सहा महिन्यांचे केबलचे पैसे त्याने भरले नव्हते. वारंवार पैशाची मागणी करुन देखील राजूने केबलचा व्यवसाय असलेल्या सचिनला पैसे दिले नव्हते. पैसे दिल्याच्या कारणावरुन सचिनने राजू याचे केबल कनेक्शन कापले. केबल कनेक्शन कापण्याच्या रागावरुन राजूने हा चाकूहल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान,सचिन हा केबल ऑपरेटर असून मेघे परिसरात त्यांचा केबलचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री सचिन हा फिर्यादी वीरेंद्र यांच्या बिछायत केंद्रात बसला होता.तेव्हा केबल कापण्याचा वचपा काढण्यासाठी राजू त्याठिकाणी आला.
केबल का कापले यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली. तेवढ्यात राजूने तीक्ष्ण चाकू काढून सचिनच्या मांडीवर दोन वार केले. या चाकूहल्ल्यात सचिनच्या मांडीवर गंभीर दुखापत झाली. तर तिसरा वार हाताने अडविल्यामुळे त्याच्या हाताची नस देखील कापल्या गेल्याचे पोलिसांनी सांगितले. चाकूहल्ला करुन आरोपी घटनास्थाळावरुन पसार झाला. सचिनला लगेचच आजूबाजूच्या लोकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपी राजूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.