अमरावती/ वरुड - बाजारात सारखेच उत्पादन देणार्या बीटी कपाशीचे अनेक वाण असूनही शेतकर्यांकडून विशिष्ट वाणाचीच मागणी होत असल्यामुळे ‘त्या’ वाणाची टंचाई निर्माण झाली आहे. संबंधित वाण जादा दराने विकले जाऊन शेतकर्यांची पिळवणूक सुरू आहे. ‘त्या’ कंपनीचे वाण घेत असताना इतर वाणांचे बियाणेही शेतकर्यांच्या माथी मारले जात आहे. विशिष्ट बियाण्यांच्या हट्टामुळे कपाशीच्या बियाण्यांचा हा काळाबाजार जिल्ह्यात सध्या जोरात सुरू असल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.
जिल्ह्यातील कृषिकेंद्रांच्या बाजारपेठेत यावर्षीही मुबलक कपाशीचे वाण उपलब्ध आहे; परंतु एखाद्या शेतकर्या ला विशिष्ट वाणाचे उत्पादन अधिक झाल्याने या वाणाचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे शेतकर्यांकडून याच वाणाची मोठ्या प्रमाणात मागणी होताना दिसून येत आहे. दरम्यान, संबंधित कंपनीने मागणी असलेल्या वाणासोबत इतरही वाण बाजारात आणले. त्यामुळे मागणी असलेल्या वाणाचा कमी पुरवठा कंपनीकडून करण्यात आल्याचे कृषी अधिकार्यांचे म्हणणे आहे. मागणी असलेल्या वाणाची टंचाई असून संबंधित वाण विक्रेत्यांकडून जादा दराने विकले जात आहे. संबंधित वाणाची पाकिटे देताना शेतकर्या ला इतर कंपन्यांचे बियाणे घेणेही काही कृषी केंद्र चालकांकडून बंधनकारक करण्यात आल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. विशिष्ट वाणाच्या हट्टामुळे जिल्ह्यात याचा काळाबाजार सुरू झाला असून, शेतकर्यांची मोठी आर्थिक पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकर्यांनी अशा बोगस बियाणांची तपासणी करून बियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
शेतकर्यांनी नोंदी तपासूनच करावी खरेदी
बियाणे, खते खरेदी करताना पावतीवर संबंधित कंपनीचा लॉट नंबर, बॅच नंबर आदी आवश्यक नोंदी करणे कृषी केंद्रचालकांना अनिवार्य आहे. शेतकर्यांनीही खरेदी केल्यानंतर पावतीवर संबंधित नोंदी केल्याशिवाय बियाणे व खतांची उचल करू नये. बियाणे व खतांमध्ये काही दगाफटका झाल्यास शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पावतीवरील या नोंदी महत्त्वाचा पुरावा ठरणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी पावतीवरील नोंदी, बियाणे व खतांच्या पाकिटावरील नोंदी तपासून पाहावी.
अधिकार्यांनी केली कृषी केंद्रांची पाहणी
वरुड पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांसह पथकाने वरुड शहर, राजुराबाजारसह तालुक्यातील कृषी केंद्रातील बियाणांची तपासणी केली. या वेळी बोगस बियाणे आढळून आले नाही. पथकामध्ये तालुकास्तरीय गुण नियंत्रण अधिकारी, कृषी अधिकारी, पं.स. कृषी अधिकार्यांच्या समावेश आहे.
केंद्रात दरफलक आहे अनिवार्य
शेतकर्यांना बियाणांचे भाव समजण्यासाठी प्रत्येक कृषी केंद्रामध्ये दरफलक लावणे दुकानदारांना अनिवार्य आहे. वरुडच्या पथकाला पाहणीत काही दुकानांमध्ये दरफलक लावलेले नसल्याचे दिसून आले. त्या दुकानदारांना दरफलक लावण्याची सूचना केल्या आहेत.
बाहेरच्या जिल्ह्यातून बोगस बियाणे वरुडात
वरुड तालुक्यामध्ये बोगस खत, बियाणांची विक्री करणारे दलाल सक्रिय झाल्याची शेतकरी वर्तुळात जोरादार चर्चा सुरू आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष असून, दलालांचे फावत असल्याचा सूर शेतकर्या मध्ये उमटत आहे. परंतु, बोगस बियाणांबाबत नागपूर जिल्ह्यातील कृषी विभागाला सुद्धा माहिती देऊन नियंत्रण ठेवण्याचे सांगण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी पंकज वानखडे यांनी दिली.
शेतकर्यांनी अनुकरण टाळावे
शेतकर्यांनी विशिष्ट वाणाची मागणी करून आपले आर्थिक नुकसान करून घेऊ नये. बीटी कपाशीमध्ये विविध कंपन्यांचेही वाण सारखेच उत्पादन देणारे आहे. बीटी वाणाचे अधिक उत्पादन वास्तवात त्या वाणाच्या शेतकर्यांकडून होणार्या सोयीवर अवलंबून असते. प्रत्येकाची खर्च करण्याची आर्थिक कुवत, जमिनीचा पोत, पाण्याची उपलब्धता, पिकाला अनुकूल वातावरण आदी घटक उत्पादन वाढीसाठी आवश्यक ठरतात. त्यामुळे शेतकर्यांनी या घटकाचा विचार करून वाणांची निवड करणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ अनुकरण म्हणून विशिष्ट वाणाची मागणी शेतकर्यांनी करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दिलीप काकडे यांनी केले आहे.
दोन लाख पाकिटांचे दिले होते उद्दिष्ट
कपाशीच्या अजित-155 वाणाचा बाजारात तुटवडा भासत आहे. कंपनीला दोन लाख पाकिटांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यात कंपनीने विविध वाणही बाजारात आणल्यामुळे ही टंचाई निर्माण झाली आहे. परंतु; शेतकर्यांनी चांगली उगवण क्षमता असलेलेच बियाणाचे वाण खात्री करूनच खरेदी करावे. केवळ अनुकरण करून बियाणे खरेदी करू नये.
- दिलीप काकडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.