आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोट दुर्घटनेतील आणखी सात मृतदेह हाती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोंदिया - गोंदिया जिल्हय़ातील घाटकुरोडा येथे बुधवारी सायंकाळी वैनगंगा नदीत बोट उलटून झालेल्या अपघातातील आणखी सात जणांचे मृतदेह हाती लागले. त्यामुळे मृतांची संख्या 13 पर्यंत पोहोचली आहे. सात जणांना बुधवारी सायंकाळीच सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.

बुधवारी सायंकाळी घाटकुरोडा येथे मंडई (जत्रा) असल्याने नदीपलीकडील उमरवाडा गावातून बोटीने गावकरी निघाले होते. बोटीत र्मयादेपेक्षा अधिक प्रवाशांची संख्या झाल्याने ती प्रवाहाच्या मधोमध आल्यावर कलंडली. बुडालेल्या बोटीत किमान 32 प्रवासी होते, असा दावा उमरवाडा येथील ग्रामस्थांकडून केला जात आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाने ती शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. प्रशासनाकडे सध्या दीपक रतिराम शेंडे या एकमेव बेपत्ता व्यक्तीची माहिती आली आहे. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे मृतांच्या संख्येचा नेमका अंदाज अद्यापही आलेला नाही. तीन मृतदेहांचा शोध घेण्यात आल्यावर अंधारामुळे काल रात्री उशिरा शोधमोहीम थांबवण्यात आली होती. गुरुवारी सकाळी स्थानिक लोकांच्या मदतीने जिल्हा प्रशासनाने शोध कार्य सुरूकेले.

नागपूर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे पथकही मदतीसाठी पाठवण्यात आले. शोध कार्यासाठी काही स्पीड बोटींची मदतही घेण्यात आली. दुपारी 3 वाजेपर्यंत आणखी 10 मृतदेहांचा शोध लावण्यात आला. काही मृतदेह प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता लक्षात घेऊन घटनास्थळापासून बर्‍याच दूरच्या अंतरापर्यंत शोधकार्य सुरू होते.

शोधकार्य सुरू असताना नदीच्या घाटांवर ग्रामस्थांनी गर्दी केली होती. बाहेर काढण्यात आलेले मृतदेह तुमसर येथील रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. रुग्णालयाच्या शवागारापुढे शोकाकुल नातेवाइकांचा आक्रोश सुरू होता. मृतांमध्ये प्रमिला झेलकर (वय 40), कौशल आसाराम बागडे (वय 40), तेजू भगवान उके (वय 2 वर्षे), रेखा प्रदीप राऊत (वय 30), तुकाराम दुलीचंद भोंगाडे (वय 35), तुषार प्रदीप राऊत (वय 12), उषा अशोक बोरघरे (वय 12), वंदना रतिराम शेंडे (वय 10), विशाल सेवक मेर्शाम (वय 11), शीतल कैलास कांबळे (वय 24) यांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतांश जण उमरवाडा येथील रहिवासी आहेत, तर शीतल कांबळे ही युवती तुमसर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गोंदियाचे जिल्हाधिकारी अमित सैनी, आमदार राजेंद्र जैन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय शिवणकर, पोलिस अधीक्षक दिलीप झळके, माजी खासदार शिशुपाल पटले या नेत्यांनी घाटकुरोडा येथे जाऊन या घटनेची माहिती घेतली.

तिरोडा, तुमसरमध्ये उपचार: या घटनेत बचावलेल्या ग्रामस्थांपैकी काहींवर तिरोडा तसेच तुमसर येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरूआहेत. तिरोडा पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असून, बचावलेल्या व्यक्तींचे बयाण नोंदवून घेतले. बोटीत नेमके किती लोक बसले होते, याबाबतचे परस्पर विसंगत आकडे बयाणात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वैनगंगा डोंगा सोसायटीच्या पदाधिकार्‍यांची चौकशी सुरू
तिरोडा तालुक्यातील वैनगंगेच्या घाटांवरून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेतर्फे लिलाव केला जातो. या वर्षी घाटकुरोडा घाटाचे कंत्राट वैनगंगा डोंगा सोसायटीला मिळाले होते. या सोसायटीच्या पदाधिकार्‍यांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.