आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena BJP Agitation, Latest News In Divya Marathi

शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी घातला ठाणेदाराला घेराओ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर केलेल्या कथित आरोपांमधील सत्यता स्पष्ट करणारी चित्रफीत दूरचित्रवाणीवर बघितल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी गाडगेनगर पोलिस ठाणे गाठले आणि प्रचंड गोंधळ घातला. प्रकरणाची शहानिशा न करता चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करा आणि अडसुळांवरील गुन्हे मागे घ्या, या दोन प्रमुख मागण्या करीत शिवसैनिकांनी पोलिस ठाण्यात जोरदार नारेबाजी केली. सेना-भाजपच्या महिला पदाधिकारीही या वेळी आघाडीवर होत्या.
रविवारी (दि. 16) एक खासगी वाहिनीच्या ‘वारी लोकसभेची’ या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या ‘आरोप-प्रत्यारोप’ नाट्यानंतर नवनीत राणा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपांची खातरजमा न करता अडसुळांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी संताप व्यक्त केला. पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले ठाणेदार दीपक कुरुलकर यांना शिवसैनिकांनी गराडा घालून घोषणाबाजी केली. कार्यक्रमाची संपूर्ण चित्रफीत उपलब्ध असताना, नेमके काय घडले, याची खातरजमा न करताच गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप या वेळी करण्यात आला.
आमदार अभिजित अडसूळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावात पोलिसांनी खासदार अडसुळांविरोधात गुन्हे दाखल केल्याचा आरोप या वेळी केला. वृत्तवाहिनी कार्यक्रमाचे निर्माता मेघराज पाटील, समीर पाटील यांना विचारपूस करून त्यांचे बयाण नोंदवण्यात आले. त्याच वेळी संबंधित वृत्तवाहिनीचा कॅमेरा आणि कॅसेट जप्त का करण्यात आली नाही, असा सवालही माजी खासदार अनंत गुढे यांनी केला. जमावाला शांत करताना पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी संपूर्ण प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडण्यात येईल, असे स्पष्ट केले.
वृत्तवाहिनीवर चित्रफीत प्रसारित
एका मराठी वृत्तवाहिनीवरील ‘वारी लोकसभेची’ कार्यक्रमादरम्यान अडसूळ आणि राणा यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे नाट्य घडले, ती चित्रफीत संबंधित वृत्तवाहिनीवर मंगळवारी सकाळी 10 वाजता प्रसारित करण्यात आली. त्यामध्ये कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य नसल्याने अडसूळ यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करीत शिवसैनिकांनी सुमारे दोन तास गाडगेनगर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. आमदार अभिजित अडसूळ, अनंत गुढे, तुषार भारतीय यांच्या नेतृत्वात दुपारी 12 च्या सुमारास दोनशे कार्यकर्ते ठाण्यावर धडकले. किरण पातूरकर, शिवसेनेचे प्रा. प्रशांत वानखडे, डॉ. राजेंद्र तायडे, वर्षा भोयर, राधा कुरील, बाळा तळोकार, प्रवीण हरमकर, पराग गुडधे आदींनी पोलिस ठाण्यात आक्रमक भूमिका घेतली. शिवसेनेने गोंधळानंतर नवनीत राणा यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याची तक्रार ठाण्यात दाखल केली.