आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Lok Sabha Election, Anandrao Adsul, MP

लोकसभेतच सेनेने उचलले विधानसभेचे शिवधनुष्य!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी शिवसेनेकडून केली जात आहे. काही महिन्यांपर्यंत खासदार आनंदराव अडसूळ विरोधात निर्माण झालेले काळ्या ढगाचे सावट आता ओसरले असून, सर्वच गट कामाला लागल्याचे दिसून येत आहे. विधानसभेचे इच्छुक त्यांच्या क्षेत्रात खासदार अडसुळांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे.


लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. 2009 मधील विधानसभा निवडणुकीत युतीतील शिवसेनेने बडनेरा, तिवसा, दर्यापूर व अचलपूर, तर भारतीय जनता पक्षाने अमरावती, धामणगावरेल्वे, मेळघाट आणि वरुड-मोश्री मतदारसंघ लढवले होते. सद्य:स्थितीत निर्माण झालेल्या राजकीय स्थितीनुसार एक किंवा दोन वगळता मतदारसंघ पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे संकेत आहे. युतीची महायुती निर्माण झाली असून, रिपाइंला (आठवले गट) जिल्ह्यातील कोणता मतदारसंघ मिळेल, याची चाचपणी झाली नसल्याने याबाबत संभ्रम कायम आहे. यातील धामणगावरेल्वे व वरुड-मोश्री मतदारसंघ लोकसभेसाठी वर्धा मतदारसंघात येतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेकडून अमरावती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्र भक्कम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत बडनेरा विधानसभा क्षेत्रातून खासदार आनंदराव अडसूळ यांना तब्बल 81 हजार मते मिळाली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्याला तत्कालीन राजकीय स्थितीचे भक्कम कारण असले, तरी यंदा होऊ घातलेल्या दोन्ही निवडणुकांवर शिवसेनेने एकाच वेळी लक्ष केंद्रित केल्याने त्याचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल. बडनेरा मतदारसंघ गड राहिला असून, मागील दोन निवडणुका वगळता येथील मतदार नेहमीच शिवसेनेच्या बाजूने राहिला आहे. त्यामुळे बडनेरामधून सेनेचे जिल्ह्यात प्रभावी नेते आणि इलेक्टिव्ह इमेज असलेले संजय बंड यांच्याकडून. जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. जिल्ह्यातील दुसरा गड आमदार अभिजित अडसूळ यांच्या रूपाने पुन्हा अबाधित ठेवण्याचा प्रयत्न होणार आहे, तर तिवसा मतदारसंघात दिनेशनाना वानखडे सेनेचे संभाव्य दावेदार म्हणून पुढे येत आहे. युतीमध्ये सेनेच्या वाट्याला असलेल्या अचलपूर मतदारसंघातून मागील वेळेस माजी खासदार निवडणूक रिंगणात होते, परंतु ते पराभूत झाले.


या वेळी तेच पुन्हा रिंगणात राहणार की नवीन चेहरा समोर येणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. काही महिन्यांअगोदर खासदार आनंदराव अडसूळ आणि जिल्ह्यात प्रभावी असलेल्या पक्षातील दोन गटांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. मात्र, लोकसभेची रणधुमाळी आरंभ झाल्यानंतर अमरावती लोकसभेवर भगवा फडकवण्यासाठी दोन प्रभावी गटांसह दुरावलेले अन्य नेतेदेखील जोमाने कामाला लागले असल्याचे चित्र आहे.