आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivesna Strike On Gas And Ration Issue At Amravati

गॅस, रेशनच्या मुद्दय़ावर शिवसेना झाली आक्रमक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- गॅस सबसिडीच्या नव्या निर्णयात अमरावतीचा समावेश नसल्याच्या मुद्दय़ाचे तीव्र पडसाद सोमवारी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात उमटले. खासदार आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या प्रतिनिधी मंडळाने त्यांची अक्षरश: कोंडी केली. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी किशोर कामुने यांनी त्यांच्या दालनात मंगळवारी (दि. 4) सकाळी 11 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्था, आधार नोंदणी आणि गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकार्‍यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गॅस सबसिडीचा मुद्दा आधार कार्डाशी जोडला गेल्याने देशभर गोंधळ उडाला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने हा निर्णय तूर्त स्थगित केला असून, ग्राहकांऐवजी थेट कंपन्यांनाच सबसिडी देण्याची जुनीच पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, असा निर्णय घेताना विदर्भातील अमरावती व वर्धा या दोन जिल्ह्यांना वगळले आहे. या दोन्ही जिल्ह्यांनी दिलेल्या अहवालानुसार, येथील रहिवाशांनी आधारसाठी नोंदणी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील 92 टक्के नागरिकांनी त्यात सहभाग घेतल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

दुकानदारांचाही तिढा
तिवसा तालुक्यातील रेशन दुकानदारांचा मुद्दाही या वेळी उपस्थित करण्यात आला. या तालुक्यातील सुमारे 80 दुकानदारांनी अन्न-धान्य मिळवण्यासाठी रकमेचा भरणा केला. परंतु, त्यापैकी केवळ 15 दुकानदारांनाच धान्य देण्यात आले. दरम्यान, शनिवारपासून (दि. 1) अन्न सुरक्षा कायदा लागू करण्यात आल्याने आता नव्या महिन्याच्या धान्याची उचल करावी, अशी सक्ती त्यांना करण्यात आली आहे. ही सक्ती निभवण्यासाठी त्यांनी जुन्या रकमेचा या कामी वापर करावा, अशी मागणी केली आहे.