यवतमाळ - हॉटेलमध्ये खोलीचे बुिकंग करण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांसोबत वाद करून त्यांना मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दारव्हा मार्गावर असलेल्या हॉटेल रेवती प्राइडमध्ये घडली.
हरिहर लिंगणवार, गणेश बायास अशी मारहाणीत जखमी झालेल्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. तक्रारीनुसार, लिंगणवार बायास हे शनिवारी रात्री हॉटेल रेवती प्राइड येथे खोलीचे बुिकंगसाठी गेले होते. दरम्यान, एका नामांकित बियाणे कंपनीत काम करणारे काही मद्यधुंद युवक हॉटेलातून बाहेर पडत होते. या युवकांशी लिंगणवार यांची कापूस उत्पादनासाठी योग्य कंपनीच्या विषयावरून चर्चा सुरू झाली. त्यात त्यांपैकी काही युवकांनी विदर्भातील शेतकऱ्यांविषयी आक्षपार्ह विधान केल्याचे म्हटले आहे.
यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात त्या मद्यधुंद युवकांनी लिंगणवार बायास यांना मारहाण केली. तसेच लिंगणवार आणि बायास यांच्या गळ्यातील सोनसाखळी,
मोबाइल असा ५५ हजारांचा ऐवज लंपास केला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी येऊन हॉटेलात लपून बसलेल्या चौदा मद्यधुंद युवकांना ताब्यात घेतले. त्या सर्वांना शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तक्रारीवरून संजय रामराव मस्के (२९), महेश विश्वनाथ गवई (२९), राहुल सुरेंद्र सिंग (२७), प्रशांत रामकृष्ण देशमुख (३२), नीलेश पुंडलिक वानखडे (३३), रोहित भगतसिंग राणा (३४) या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. दरम्यान, आमदार संजय राठोड यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती.