आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परस्परांमधील मतभेद विसरून कामाला लागा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - आपसातील मतभेद विसरून कामाला लागा, असा सल्ला अमरावती लोकसभेचे निरीक्षक अनिल चव्हाण यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांना बुधवारी दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मुंबई येथे गुरुवारी (दि. 23) प्रतिज्ञा सभेचे आयोजन होत आहे. त्याच्या नियोजनाबाबत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये बैठक झाली. या वेळी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा, तालुका तसेच मतदारसंघनिहाय बूथप्रमुखांची माहिती पदाधिकार्‍यांना असणे गरजेचे आहे. अनेकदा जिल्हाप्रमुखांना बूथप्रमुखांची माहिती नसते, असा अनुभव आहे. मुंबई येथील कार्यक्रम ऐतिहासिक करावयाचा असल्याने कार्यकर्त्यांनी त्याप्रमाणे मेहनत घ्यावी. संसदेवर आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडवण्याची प्रतिज्ञा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना देणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर प्रथमच होणारा हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे. यानिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. संपर्कनेते खासदार आनंदराव अडसूळ, अमरावती विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक विष्णू तांडेल, बडनेरा मतदारसंघाचे निरीक्षक सुनील साळवी, दर्यापूर मतदारसंघाचे निरीक्षक जनार्दन मोरे, तिवसा मतदारसंघाचे निरीक्षक प्रमोद पार्टे, सहसंपर्कप्रमुख नाना वानखडे, जिल्हाप्रमुख संजय बंड, बाळासाहेब हिंगणीकर, प्रा. प्रशांत वानखडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा लोखंडे, वर्षा पुंड, दर्यापूर पंचायत समितीच्या उज्‍जवला रहाटे या वेळी उपस्थित होत्या. प्रा. वानखडे यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्याला पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.