आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतवाड्यात सराफा दुकानाला आग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- परतवाडा शहरातील एकता आभूषण या सराफा शोरूमला शुक्रवारी (दि. 23) सकाळी साडेआठ वाजता अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागल्याचे बोलले जाते. या घटनेमुळे अग्निशमन विभागाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
जयस्तंभ ते दुराणी मार्गावरील नगर परिषदेसमोर असलेल्या एकता आभूषण या प्रतिष्ठानाच्या तळघरात ‘शॉर्ट सर्किट’मुळे आग लागली. दुकानातून आगीचा धूर निघत असल्याचे शेजारी राहणारे मधुकर लांडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच दुकानाचे मालक सुरेश अटलानी व राजेश अटलानी यांना माहिती दिली. त्यानंतर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला आगीची माहिती देण्यात आली. तळघरातील आग विझवण्यासाठी खिडकीतून पाण्याचा मारा करण्यात आला. मात्र, खिडकीतून मोठय़ा प्रमाणात धूर बाहेर निघत असल्याने मदतकार्यात अडचण निर्माण झाली. नगर परिषद कर्मचार्‍यांसोबत स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला. या आगीत तळघरात ठेवलेले चांदीचे वर्क केलेल्या फ्रेम, इलेक्ट्रॉनिक सामान, अनेक चांदीचे साहित्य, ज्वेलरी विक्रीप्रसंगी सोबत दिले जाणार्‍या पॅकिंग डब्या आदी साहित्य खाक झाले. मात्र, शोरूमचे मुख्य दुकान सुरक्षित राहिले. या आगीत दहा ते बारा लाख रुपयांचे ज्वेलरी साहित्य खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अग्निशमन विभागाला नाही माहिती :
एकता आभूषणाच्या तळमजल्यात आग लागल्याची माहिती पालिकेच्या अग्निशमन विभागाला फोनद्वारे देण्यात आली असता, तेथील कार्यरत कर्मचार्‍याने एकता आभूषण कुठे आहे, अशी विचारणा केली. अग्निशमन कर्मचार्‍यांना शहराची भौगोलिक माहिती असणे आवश्यक असताना शेजारीच असलेल्या एकता आभूषणची माहिती नसणे, ही बाब चिंताजनक आहे.