आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पितृपक्षात खरेदीला बसलाय ‘ब्रेक’; वाहन, घर, सोने-चांदी खरेदीवर होतोय परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शुक्रवारपासून सुरू झालेल्या पितृपक्षात नवीन खरेदीला ‘ब्रेक’ लागला आहे. शास्त्रानुसार, गणपती विसर्जनानंतर साधारणत: घटस्थापनेपर्यंत कुठलेही शुभकार्य टाळले जाते. भाद्रपद प्रतिपदेपासून तर अमावास्येपर्यंत पितृपंधरवडा असतो. या पंधरा दिवसांत ज्ञात-अज्ञात मृतांसाठी पिंडदान, श्राद्ध करण्यात येतो. मोक्षप्राप्तीसाठी ब्राह्मण भोजन केले जाते. निकटवर्तीयांचे ज्या तिथीला निधन झाले असेल, त्या तिथीला पंधरवड्यात श्राद्ध केले जाते. मृत पूर्वज म्हणजे पितर होत. पूर्वजांच्या तर्पणाचा हा कालावधी असतो. तर्पणात पिंड, काळे तीळ, तांदुळाचे पिंड आणि जलदान केले जाते. निधन झालेल्यांचे स्मरण केले जाते. त्यानंतर पितरांच्या नावाने ब्राह्मणभोज केला जातो.

सर्वसाधारणपणे मंगलकार्यासाठी सवाष्ण-ब्राह्मण सहज उपलब्ध होतात, परंतु पितृपक्षातील ब्राह्मण भोजनासाठी वेद जाणकार सहज मिळत नाहीत. श्राद्धपक्षातील भोजन ग्रहण केल्यानंतर गायत्री मंत्राचे 11 हजार जप करण्याचा शास्त्रोक्त नियम आहे. धकाधकीच्या युगात हा नियम पाळणे वैदिक ब्राह्मणांना शक्य होत नाही. त्यामुळे ते श्राद्ध भोजन टाळतात.

पितृपक्षात नवीन वाहन खरेदी, विवाह, व्रतबंध, गृहप्रवेश आणि नवी खरेदी टाळली जाते. सोने-चांदीची खरेदीही टाळली जाते. त्याचा परिणाम बाजारपेठेवरही दिसत आहे. वाहनविक्री, गृहकर्ज, सोने-चांदीच्या अलंकारांची विक्री, विवाहकार्य, मौंज, नवीन प्लॉट, फ्लॅट खरेदीलाही पितृपक्षामुळे चांगलाच ‘ब्रेक’ बसला आहे.