आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसाचा दांडाही ‘डेक्कन’ला देणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरखेड - यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या शेतक-यांनी दुबार, तिबार पेरणी करूनही पीक परिस्थिती समाधानकारक नाही. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तेव्हा मंगरूळ डेक्कन साखर कारखान्याने उमरखेड-महागाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या हक्काचा मोबदला त्वरित द्यावा; अन्यथा कारखान्याविरुद्ध तीव्र आंदोलन उभारून पुढील हंगामात कारखान्यास उसाचा एकही दांडा मिळू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे डॉ़ विश्वनाथ विणकरे यांनी दिला. डेक्कन साखर कारखान्यावर नुकत्याच काढण्यात आलेल्या मोर्चाप्रसंगी ते बोलत होते.

मागील हंगामात उमरखेड आणि महागाव तालुक्यांतील ब-याच शेतक-यांनी आपला ऊस मंगरूळ येथील डेक्कन साखर कारखान्याला दिला होता. लगतच्या साखर कारखान्याने उसाला जो भाव दिला, तोच भाव आम्हीही देऊ, असे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले होते़ त्यांनी सुरुवातीला 1700 रुपये प्रतिटनप्रमाणे मोबदला दिला. मात्र, जवळच्या हदगाव येथील भाऊराव साखर कारखान्याने दोन हजार रुपये प्रतिटनप्रमाणे भाव दिला. डेक्कन साखर कारखान्याने शेतक-यांचे नुकसान केले असल्याची शेतक-यांची भावना आहे. त्या भावाच्या हिशेबाने उरलेले प्रतिटन 300 रुपये शेतक-यांना सध्याच्या आर्थिक संकटप्रसंगी देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी कारखान्याला निवेदने दिली; तरीसुद्धा कारखान्याने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. भाजपच्या वतीने शेतक-यांच्या रास्त मागण्यांसाठी डेक्कन साखर कारखान्यावर नुकताच मोर्चा काढण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी डी. एस. भट यांच्याकडे शेतक-यांनी आपल्या व्यथा मांडून निवेदन दिले. जिल्हा सरचिटणीस मनोज इंगोले, अजय बिहाडे, उमरखेड विधानसभा प्रभारी जयदीप सानप, भाजयुमोचे भाविक भगत, रमेश चव्हाण, सुनील टेमकर, सुनील टाक, विजय आडे, रामजी नाईक, प्रा़ हरीश पाचकोरे, नारायण ईटकरे आदी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.