आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तुम तो ठहरे..’ने केले मंत्रमुग्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-हार्मोनियम, तबल्यासह विविध वाद्यांच्या तालावर प्रसिद्ध गायक अल्ताफ राजा यांच्या ‘तुम तो ठहरे परदेसी..’ या कव्वालीने गुलाबी थंडीत अमरावतीकरांच्या हृदयाचा ठाव घेतला. एकाहून एक उत्कृष्ट कव्वालींचे सादरीकरण, प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त टाळ्या, शिट्या, वन्समोअरच्या जल्लोषात फुलून गेलेले मैदान, अशा संगीतमय वातावरणात अल्ताफ राजा यांनी आपल्या बहारदार आवाजाने रसिकांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले.

निमित्त होते, लोकसन्मान परिषदेतर्फे सायंस्कोर मैदानावर सुरू असलेल्या युवा महोत्सवाचे. लोकसन्मान परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष गुणवंत देवपारे यांच्या मार्गदर्शनात शनिवारपासून सुरू झालेल्या महोत्सवात रविवारी (दि. 2) अल्ताफ राजा यांनी अनेक बहारदार कव्वाली सादर करीत उपस्थितांना भुरळ घातली. हा महोत्सव तीन दिवस चालणार असून, युवकांच्या कलागुणांना वाव मिळावा, प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांना ऐकता यावे, यासाठी लोकसन्मान परिषदेतर्फे अमरावती युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.


‘या मुस्तफा.या मुस्तफा,’ ‘सय्यदो या हबबी मौला..’असे दज्रेदार कव्वाली सादर करून राजा यांनी अनेकांना घायाळ केले. ‘वाह वाह..क्या बात है, बढिया., जबरदस्त..’अशा उत्स्फूर्त प्रतिसादांनी रसिकांनी सादरीकरणाला दाद दिली. गुलाबी थंडीत तब्बल तीन तास राजा यांनी आपल्या दज्रेदार कव्वालींनी प्रेक्षकांना रिझवले. ‘या मुस्तफा..या मुस्तफा.’ कव्वालीने सुरुवात करून राजा यांनी मैदानावर संगीतमय माहोलाची निर्मिती केली होती. त्यानंतर राजा यांनी कव्वालीत अशी काही रंगत आणली, की प्रेक्षकांनी ‘याचि देही, याचि डोळा’ असा अभूतपूर्व सोहळा अनुभवला. राजा यांना बघण्यासाठी तसेच त्यांच्या कव्वालीचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षकांनी मैदान तुडुंब भरले होते. ज्या ठिकाणी जागा मिळेल, त्या ठिकाणी उभे राहून प्रेक्षकांनी राजा यांच्या कव्वालीचा आनंद लुटला. कव्वालीदरम्यान, रसिकवर्गही अत्यंत शांततेत कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते.

दरम्यान, रविवारी (दि. 2) उद्योग व स्पर्धा परीक्षा कार्यशाळा, आदर्श शिक्षक सत्कार समारंभ आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे या निमित्त आयोजन करण्यात आले होते. उद्योजक देविदास राऊत, उद्योजक भीमराव क्षीरसागर, आयएएस डॉ. प्रदीप गावंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सोमवारी (दि. 3) लोकसन्मान परिषदेच्या सातशे शाखांचे गुणवंत देवपारे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

त्यानंतर धम्मदान सोहळ्यात 47 मूर्तींचे दान करण्यात येईल. नृत्यस्पर्धा, गायन स्पर्धा, रुग्णवाहिका लोकार्पण, स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप, दिनदर्शिकेचा लोकार्पण आदी कार्यक्रम महोत्सवात आयोजित करण्यात आले आहेत.

‘तुम तो ठहरे..’ कव्वालीला रसिकांकडून वन्स मोअर
राजा यांनी दज्रेदार कव्वालीचे सादरीकरण करून अनेकांच्या हृदयाचा ठाव घेतला. दरम्यान, लोकांना प्रतीक्षा होती, ती- ‘तुम तो ठहरे परदेसी.साथ क्या निभाओगे’ कव्वालीची. राजा यांनीही आपल्या खास अंदाजात कव्वालीचे असे सादरीकरण केले, रसिकांनी टाळ्यांच्या गजरात वन्स मोअर करीत कव्वालीची फर्माइश केली. गुलाबी थंडीत आपल्या बहारदार कव्वालीने राजा यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.