आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन फंडा : राष्ट्रीय महामार्गावर होते विविध वस्तूंची ‘तस्करी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर विविध वस्तूंची तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महामार्गावर मधोमध ट्रॅव्हल्स थांबवून वस्तूंची देवाण-घेवाण होते. ट्रॅव्हल्समधून अन्य वाहनांनी शहरात आणण्यात आलेल्या वस्तू विक्रेत्यांपर्यंत पोहचवल्या जातात. दिवसाढवळ्या हा गोरखधंदा होत असताना महामार्ग पोलिस सुस्त असल्याचे चित्र आहे.

मुंबई, सुरत, अहमदाबाद आदी मोठ्या शहरांतून अमरावतीमध्ये विविध वस्तूंची खासगी वाहनांमधून तस्करी केली जात आहे. मोठ्या शहरांमधून प्रशासनाच्या डोळ्यांत धूळफेक करीत विविध साहित्य ट्रॅव्हल्समधून आणले जात आहे. एक्स्प्रेस हायवेवर हा प्रकार सर्रास होत आहे. पाळा येथील नाका पास केल्यानंतर बडनेरा, एमआयडीसी, महादेव खोरी परिसरात ट्रॅव्हल्स थांबवली जाते. त्याचवेळी अमरावती येथील संबंधित व्यक्तीचे खासगी वाहन किंवा ऑटो तेथे आधीच पोहोचलेले असतात. आजूबाजूला कोणी नसल्याचा अंदाज घेतल्यानंतरच ट्रॅव्हल्समधून विविध साहित्य ऑटो किंवा वाहनामध्ये ठेवले जाते. साहित्य आणल्याचा ‘व्यवहार’ पूर्ण केल्यानंतर ट्रॅव्हल्स पुढील प्रवासाला जाते. स्थानिक संस्था कर चुकवत विविध महागड्या वस्तूंची तस्करी या माध्यमातून होण्याची अधिक शक्यता आहे.

एक्स्प्रेस हायवेच्या कडेला ट्रॅव्हल्स थांबवण्यात आल्यानंतर एखादा प्रवासी उतरत असल्याचे येथून येणा-या-जाणा-यांना भास होतो. मात्र, चित्र वेगळेच असते. हा प्रकार नक्कीच गंभीर असून, याच प्रकारे शहरात अमली पदार्थ, स्फोटके, हत्यारदेखील आणले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महामार्ग पोलिसांचे सपशेल दुर्लक्ष
राष्ट्रीय महामार्ग तस्करीचे केंद्र बनत असताना महामार्ग पोलिस मात्र निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. यांसह प्रादेशिक परिवहन विभागाचे फ्लाइंग स्कॉडदेखील कोणते कर्तव्य बजावत आहे, हे यावरून स्पष्ट होते. मागील अनेक वर्षांपासून दोन्ही विभागांकडून या भागामध्ये मोठी कारवाई झाली नाही. महामार्ग पोलिस व प्रादेशिक परिवहन विभाग ‘पांढरा हत्ती’ ठरत असल्याचे चित्र आहे.

वाहने मध्येच थांबतात तरी कशी?
एक्स्प्रेस हायवे हा सुपर हायवे असल्याने प्रवासी असो वा कोणतेही वाहन, मधोमध थांबवता येत नाही. शहराच्या बाजूने जाणा-या एक्स्प्रेस हायवेवर वाहन मधोमध थांबत असेल, तर हा गंभीर प्रकार आहे. शिवाय यावर नजर ठेवण्यासाठी महामार्ग पोलिस असताना अर्ध्या तासामध्ये तीन ट्रॅव्हल्समधून अशाप्रकारे साहित्य उतरवण्यात आले. असे असतानाही पोलिसांचा थांगपत्ता नव्हता.

अशी होते तस्करी
० पाळा येथील नाका पास केल्यानंतर बडनेरा, एमआयडीसी, महादेव खोरी परिसरात ट्रॅव्हल्स थांबवली जाते.
० अमरावती येथील संबंधित व्यक्तीचे खासगी वाहन किंवा ऑटोरिक्षा तेथे आधीच पोहोचलेले असतात.
० आजूबाजूला कोणी नसल्याचा अंदाज घेतल्यानंतरच ट्रॅव्हल्समधून विविध साहित्य ऑटोरिक्षा किंवा वाहनामध्ये ठेवले जाते.
० साहित्य आणल्याचा ‘व्यवहार’ पूर्ण केल्यानंतर ही प्रवासी वाहतूक करणारी खासगी ट्रॅव्हल्स पुढील प्रवासाला निघते.

तस्करीमध्ये महागड्या वस्तूंचा समावेश
अमरावती महानगरपालिकेकडून शहरात येणा-या वस्तूंवर स्थानिक संस्था कर आकारला जातो. यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. एलबीटी व आयकर चुकवल्यास दुकाने सील केली जात आहेत. यातून बाहेर पडण्याचा नवीन फंडा व्यापा-यांनी शोधला आहे. या माध्यमातून एलबीटी चुकवत विविध महागड्या वस्तूंची तस्करी होण्याची दाट शक्यता आहे. याद्वारे व्यापा-यांचा लाभ घेत असला तरी महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.