आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती - वाढत्या नागरीकरणामुळे शहराभोवतालची सापांची वसतिस्थाने नष्ट होत चालली आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अगदी सामान्यपणे दिसणारे ‘तस्कर’, ‘डुरक्या घोणस’, ‘धूळनागीन’, ‘मांडूळ’ आणि ‘ब्रँडेड कुकरी’ या सापांच्या प्रजातींचे दर्शन दिवसेंदिवस दुर्मीळ झाले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक असल्याचे सर्पमित्रांनी मत व्यक्त केले आहे.
शहरालगत शेतजमीन, पडीक जमिनी, छत्री आणि वडाळी तलाव हे जलसाठे, विद्यापीठ परिसराच्या डोंगराळ भागात पूर्वी विविध प्रजातींच्या सापांचे हमखास वास्तव्य असायचे. नागरीकरणाचा झपाटा वाढल्याने जमिनीवर बुलडोजर फिरवून त्यांची टणक मैदाने होताहेत. त्याच्या परिणामी अनेक प्रजातींची वसतिस्थाने नष्ट होत आहेत. या ठिकाणी काम सुरू असताना साप दिसल्यास त्याला चिरडले जाते. पूर्वी सर्पमित्रांच्या हेल्पलाइनवर शहराच्या कानाकोपर्यातून कॉल यायचे. त्यामुळे साप जिवंत पकडून रानात सोडले जायचे. अलीकडे या कॉलचे प्रमाण कमी झाल्याने सर्पमित्रांनी खंत व्यक्त केली आहे.
छोटी झुडुपे नष्ट होताहेत
वन्यजिवांसाठी जिल्ह्यातील वातावरण पोषक आहे. मात्र, अलीकडे शहराबाहेरील छोटी झुडुपे नष्ट होत आहेत. त्यामुळे अनेक प्रजाती पाहायला मिळत नाहीत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. नीलेश कंचनपुरे, सर्पमित्र, मधुबन वन्यजीव संरक्षण संस्था
सापांविषयी वैर असू नये
शहराच्या सभोवताली असलेल्या जंगलात पाली, उंदीर यासारखे छोटे भक्ष्य खाण्यासाठी पूर्वी सापांच्या प्रजाती सर्रास आढळायच्या. त्या आता दिसून येत नाहीत. पर्यावरणाच्या साखळीतील तो महत्त्वाचा प्राणी असल्याने सापांविषयी लोकांच्या मनात वैरभावना असू नये. राघवेंद्र नांदे, सचिव, कार्स संस्था
दर्शन झाले दुर्मिळ
अमरावती जिल्ह्यात सापांच्या एकूण 33 प्रजाती आहेत. त्यातील बांबू पीट व्हायपर, फॉस्टर कॅट स्नेक आणि खापरखवल्या या तीन प्रजाती प्रामुख्याने मेळघाटात आढळतात. या प्रजाती पूर्वी शहरालगत मोकळ्या रानात आढळून यायच्या. मात्र, आता त्यांचे दर्शन दुर्मीळ झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.