आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीटीएड, बीएडकडील विद्यार्थ्यांचा कल ओसरला ; जागा 1700; अर्ज 412

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - कधीकाळी डीटीएड, बी.एड.कडे विद्यार्थ्यांचा व्यापक प्रमाणावर कल होता. हा कल लक्षात घेऊन अध्यापक महाविद्यालयांची संख्याही भरमसाट वाढली आहे. मात्र, शिक्षकी पेशाच्या दुर्मिळ होत असलेल्या संधी व त्यासाठी मोजावा लागत असलेला रग्गड पैसा यामुळे डीटीएड, बीएडकडे विद्यार्थी फिरकेनासे झाले आहे. त्यामुळे अध्यापक विद्यालयांना आता विद्यार्थी शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. जिल्ह्यातील अध्यापक महाविद्यालयामध्ये एकूण 1700 जागा रिक्त असताना नवीन सत्रासाठी केवळ 412 विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत.

शिक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या मंदीमुळे अध्यापक महाविद्यालयांवर विद्यार्थी शोधण्याची पाळी आली आहे. मात्र, तरीही विद्यार्थी मिळत नसल्याने कमीत कमी पैशात डीटीएड किंवा बीएडची संधी देण्याची अहमहमिका संस्थांमध्ये लागली आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी चक्क सव्वादोनशे रुपयात डीटीएडला प्रवेश घ्या, अशी जाहिरात झळकल्याने शिक्षण क्षेत्रातील अनेकांचे डोळे ताणल्या गेले आहे. त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील डीटीएड महाविद्यालयांचा मागोवा घेतला असता जिल्ह्यातील महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या एकूण सुमारे 1700 जागांसाठी अवघ्या 412 इच्छुकांनी अर्ज केले होते. 17 जून ही प्रवेशाची अंतिम तारीख होती. मात्र, ती उलटून गेल्यानंतर आता प्रसंगी व्यवस्थापनाच्या कोट्यातून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. यात प्रवेश मुदतवाढही मिळू शकते, मात्र या प्रशिक्षणासाठी विद्यार्थीच मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे संस्थाचालकांना पेच पडला आहे.

यंदा डीटीएडला विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने अध्यापक महाविद्यायात विद्यार्थी मिळवण्यासाठी स्पर्धाच लागली असल्याचे चित्र आहे. प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने विविध प्रलोभन दिले जात आहे. काही ठिकाणी प्रवेश फीमध्ये सवलत देण्यात येत आहे, तर काही ठिकाणी शिष्यवृत्तीद्वारे फी घेण्याचे आश्वासन दिले जात आहे.
परिस्थितीत झाला बदल
काही वर्षांपूर्वी डीटीएड बीएडच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल होता. या पदवीकेनंतर नोकरी मिळण्याची हमी वाटत असे मात्र कालांतराने विद्यार्थी संख्या वाढल्याने नोकरीच्या संधी दुर्मिळ झाल्या आहेत. परिणामी या अभ्यासक्रमाकडील कल कमी झाला आहे.
डीटीएडचा सुवर्णकाळ
1990 ते 2010 या दोन दशकात राज्यात मोठय़ा प्रमाणात डीटीएडधारकांची संख्या वाढली. उच्चशिक्षित असलेल्या विद्यार्थ्यांनीदेखील यादरम्यान डीटीएडला प्रवेश मिळवून नोकरी पत्कारली. मात्र, मागील चार ते पाच वर्षांपासून शिक्षकांची भरती शासन करत नसल्याने दरवर्षी लाखो विद्यार्थी डीटीएडमधून बाहेर पडून बेरोजगार होत आहेत. आजच्या परिस्थितीत डीटीएड पदवीकाधारकांची राज्यातील संख्या पाच लाखांच्यावर असल्याचे समजते. दुसरीकडे विविध स्वतंत्र विषयाच्या शाखा उदयास येत आहे, त्यामुळे प्रवेश प्रक्रिया कमी होत आहे.
27 डीटीएड महाविद्यालये
बुलडाण्यात 6
लोणारमध्ये 2
शेगाव 2
मलकापूर 3
मेहकर 3
चिखली 4
खामगाव 2
संग्रामपूर 1
मोताळा 1
सिंदखेडराजा 1
देऊळगावराजा 1
नांदुरा 1
जळगाव जामोद 0
बुलडाण्यात एक शासकीय अध्यापक महाविद्यालय आहेत.
अर्ज स्वीकारणे सुरूच
जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या वतीने डीटीएड प्रवेश प्रक्रियेसाठी 2 जून 2014 पासून अर्ज विक्री सुरू करण्यात आली होती. 17 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शहरातील शासकीय अध्यापक महाविद्यालय या ठिकाणी अर्ज स्वीकारले गेले.
तीन वर्षांपूर्वी दोन वर्षांच्या डीटीएड अभ्यासक्रमात प्रवेश प्रक्रियेसाठी मोठय़ा प्रमाणात प्रवेश फी आकारण्यात येत होती. एका वर्षाची फी ही जवळपास 12 हजार रुपये अशी होती. विद्यार्थ्यांना दोन वर्षाच्या अभ्यासासाठी जवळपास 24 हजार रुपयेपर्यंत फी भरावी लागत होती. विद्यार्थ्यांचा या दोन शैक्षणिक वर्षात सुमारे 40 हजार रुपयेपर्यंत खर्च येत होता. मात्र, आता डीटीएड प्रवेशासाठी केवळ 210 रुपयात प्रवेश देण्याच्या आकर्षक जाहिराती देऊन अशा महाविद्यालयांकडून विद्यार्थी मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.