आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi,Yavatmal

सोशल मीडियावर दिवसभर बरसला मतदान संदेशांचा पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - सशक्त लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क अवश्य बजावा, मतदान करणे प्रत्येकाचा अधिकार आहे, तो अधिकार वापरावा असे एक ना अनेक संदेश, आणि त्या संदेशांना विशिष्ट फोटोंचा आधार असलेले पोस्ट आज मतदानाच्या दिवशी सोशल मीडियावर सुरू होते. त्यामुळे व्हॉट्स अँप आणि फेसबुकवर दिवसभर अशा संदेशांचा जणू पाऊसच पडत होता.
यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी उमेदवारांनी सोशल मीडियाचा मोठय़ा प्रमाणात वापर केल्याचे दिसुन येत आहे. त्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमुक या उमेदवाराला मतदान करा, हा उमेदवार कसा योग्य आहे, तो निवडून आल्यास होणारे फायदे, त्याचे निवडून येणे कसे महत्त्वाचे आहे, अशा प्रकारच्या अनेक पोस्ट गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियावर झळकत आहेत. त्यामुळे जणू काही या सर्व ठिकाणी उमेदवारांचे प्रचार युद्ध सुरू असल्याचा भास होत होता. त्यात उमेदवारांचे कार्यकर्ते अग्रेसर होते. मात्र निवडणुकीसाठी मतदान करण्याचा दिवस येताच बुधवारी रात्रीपासून व्हॉटस अँप आणि फेसबुकसारख्या सर्व सोशल साईट्सवर मतदान करा, मतदान करणे का आवश्यक आहे, अशा प्रकारच्या पोस्ट अपलोड करुन मतदारात जनजागृती करण्याचे काम सुरू झाले होते. त्यामुळे मतदानाच्या दिवशीही सायंकाळी उशिरापर्यंत अशा पोस्टचा अक्षरश: पाऊस या सोशल साईट्सवर पडलेला दिसून आला. काही ठिकाणी या पोस्टसोबत अमुक एखाद्या पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करण्याचा आग्रहही करण्यात आल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे विविध पक्षांच्या नेत्यांच्या आवाजातील संदेश सुद्धा एकमेकांना मोबाइलद्वारे पाठवण्यात आले. विशेष म्हणजे, यामध्ये नरेंद्र मोदी, राहुल गांधी, सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल यांचे फोटो आणि पक्षांचे चिन्ह यांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे आज दिवसभर सोशल मीडियावर जणू काही निवडणूक युद्ध पेटलेले दिसून आले. लोकशाहीसाठी मतदान आवश्यक असल्याबाबत सोशल मीडियावरून जनजागृती करण्यात आली. एकमेकांना पाठवलेल्या संदेशावरून बरीच जागृती करण्यात आली. पण पोस्ट वाचून मतदान करण्यासाठी तरुणाईने फारसा पुढाकार घेतला नसल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरुन दिसून येते.