आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Solar Light For Farmers By Aapulki Organisations

शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना दिवाळीत ‘आपुलकी’ने दिली सौरदिव्यांची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सामाजिक बांधिलकी जोपसण्यासाठी; तसेच शेतकर्‍यांच्या हितासाठी पुढाकार घेत आपुलकी संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून दिवाळीच्या पर्वावर आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या दारी प्रकाशवाट पोहचवत त्यांच्या कुटुंबीयांना सौरदिवे व साडीचे वाटप केले. आपुलकी संस्थेच्या वतीने शनिवारी (दि. 2) मोर्शी रोडवरील कृषी महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याअंतर्गत माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांच्या हस्ते जिल्ह्यातून आलेल्या विविध 51 आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना या वेळी या सौरदिवे व साडीचे वाटप करण्यात आले. या वेळी आपले मत व्यक्त करताना सुनील देशमुख म्हणाले, की देशातील 80 टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. कृषिप्रधान देशात दिवसेंदिवस शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. एकीकडे जातीचे राजकारण सुरू असताना शेतकरी वर्ग संघटित नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकर्‍यांनी संघटित होणे गरजेचे आहे, त्यासाठी त्यांची एक जात; ती म्हणजे शेतकर्‍यांची जात प्रस्थापित करण्याची गरज असल्याचे देशमुख म्हणाले.

शेतकरी संघटित होईल, तेव्हाच त्यांच्या आत्महत्यांना आळा बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.आपुलकी या संस्थेने पुढाकार घेऊन शेतकर्‍यांना संघटित करण्याचा वसा घेतला आहे. संस्थेच्या वतीने शेतकर्‍यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महत्त्वपूर्ण काम होत असल्याचेही देशमुख यांनी या वेळी स्पष्ट केले.

माजी महापौर मिलिंद चिमोटे, महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर चिखले, आपुलकी संस्थेचे अभिजित फाडके, माई बोके, किशोर चांगोले, प्रकाश साबळे व राहुल तायडे या वेळी उपस्थित होते.