आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमर्जन्सीसाठी आता महामार्गावर खास फोन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करताना तुमच्या समोर एखादा अपघात झालाय किंवा तुमची गाडी बंद पडल्याने ती क्रेनने उचलून रस्त्याच्या कडेला न्यायची आहे. तुमच्यावर हल्ला झालाय आणि पोलिसांची मदत हवी आहे, तर आता चिंता नको. अशा आपत्कालीन प्रसंगी प्रवाशांना तातडीने मदतीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर खास फोन सुरू केले आहेत.


बडनेरा नवीन महामार्गाच्या वळण रस्त्यापासून तिवसापर्यंतचे सर्व टोल नाके आणि भारतीय रस्ता ब्यूरोची आपत्कालीन केंद्र या खास फोनने जोडण्यात आली आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक टोल नाक्यावर आयआरबी आणि एनएचएआयने विनामूल्य रुग्णवाहिका सेवा व क्रेन सेवाही उपलब्ध करून दिली आहे.


महामार्गाच्या दोन्ही बाजूने पिवळ्या रंगाच्या डब्यात हे फोन्स बसवण्यात आले आहे. या फोनला केवळ एकच बटन आहे. हे बटन दाबल्यानंतर व्यक्ती आयआरबीच्या महामार्ग आपत्ती नियंत्रण कक्षाशी थेट संपर्क साधू शकते. संकटाचे स्वरूप सांगून नियंत्रण कक्षातील कर्मचार्‍यांकडून मदतही मिळवू शकतो.


मदत कशी मागाल?

प्रत्येक एक किलोमीटरच्या अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला पिवळ्या रंगाचे डबे दिसतील. तेच खास फोन आहेत.

संकटात असल्यास तुम्ही या फोनच्या स्क्रीनवर असलेले पुश टू टॉक बटन दाबू शकता. त्यातून बीप आवाज येईल.


त्यानंतर हे बटन दाबून ठेवा आणि तुमच्या संकटाचे स्वरूप सांगा. पलीकडून नियंत्रण कक्षातील अधिकारी, कर्मचारी तुम्हाला प्रतिसाद देतील व मदतीसाठी पुढाकार घेतील.