आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराजवळून दररोज फिरतेय पट्टेदार वाघीण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहराला लागूनच असलेल्या पोहरा-मालखेड संरक्षित वनक्षेत्रात पट्टेदार वाघीण आढळली आहे. वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये आता या वाघिणीचे चित्र निघाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोहरा-मालखेड परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे बोलले जात होते.
शहराला लागूनच असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या छावणी आणि अमरावती विद्यापीठाच्या परिसरातही बिबट्याचा वावर आढळला होता. तेव्हापासून आढळलेला वन्यप्राणी बिबट, की अन्य कोणता पशू, याबद्दल शोध सुरू होता. आता वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघिणीचे फोटो आल्याने या परिसरात पट्टेदार वाघीण असल्याचे सिद्ध झाले आहे.
एसआरपीएफ कॅम्पचा परिसर शहरापासून एक ते दीड किलोमीटर आहे. सुमारे दोन वर्षांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे सातत्याने बोलले जात होते. वन्यजीव प्रेमींनी या भागात बिबटच नव्हे, तर पट्टेदार वाघीण असल्याचाही दावा केला होता; परंतु या दाव्यांकडे सुमारे दोन वर्षांपासून दुर्लक्ष करण्यात येत होते.

याबाबत वन्यजीवप्रेमींनी परिसरात गस्त घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोहरा-मालखेडच्या परिसरात पट्टेदार वाघीण असल्याच्या अनेक खुणा आढळल्या होत्या; परंतु हा परिसर अमरावती शहरापासून जवळच असल्याने ठोस पुरावे असल्याशिवाय कोणताही दावा करणे म्हणजे लोकांच्या मनात धडकी भरवण्यासारखे होईल, असे अनेकांना वाटत होते. त्यामुळे वन विभागाच्या मदतीने या भागात कॅमेरा ट्रॅप बसवण्यात आले. वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये पट्टेदार वाघीण कैद झाली आहे. पोहराच्या काॅरिडॉरमधून या वाघिणीचा ब-यापैकी वावर आहे.