आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसआरपीएफ जवानाचा गोळी लागल्याने मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्य राखीव पोलिस दल, अमरावती बल गट क्रमांक येथे नेमणुकीस असलेल्या सध्या गडचिरोलीमध्ये कार्यरत एका ३० वर्षीय जवानाचा सोमवारी रात्री स्वत:च्याच बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण एसआरपीएफमध्ये खळबळ उडाली आहे. या जवानाच्या पार्थिवावर मंगळवारी (दि. २८) वाशीम जिल्ह्यातील खरोडा या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महादेव सखारामजी ठाकरे (३०, ब. न. ३०७) असे मृत्युमुखी पडलेल्या जवानाचे नाव आहे. महादेव ठाकरे हे अमरावती एसआरपीएफच्या "सी' कंपनीला पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते. मात्र, सध्या त्यांची प्रतिनियुक्तीवर "ई' कंपनीमध्ये नेमणूक होती. सध्या "ई'कंपनी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा उपविभागात असलेल्या पेंढरी या पॉइंटवर तैनातीला आहे. सोमवारी (दि. २७) रात्री १० ते १२ या वेळात ठाकरे यांची याच पॉइंटवर पहारा ड्युटी होती. ड्युटी संपण्यासाठी १५ मिनिटे बाकी असतानाच म्हणजे ११ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास एकाएकीच गोळीचा आवाज आला. त्या वेळी ठाकरे यांच्या सहकाऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली असता, ही गोळी ठाकरे यांना लागल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या खांद्याला ही गोळी लागल्याचे आढळले. ठाकरे यांच्या शरीरातून रक्तस्राव सुरू झाला. त्यांना उपचारासाठी तातडीने गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा वाटेतच मृत्यू झाला होता. ही गोळी नेमकी कशी लागली, याबाबत अद्याप कोणतेही ठोस कारण पुढे आलेले नाही. मात्र, (मिसफायर) चुकून ठाकरे यांच्याकडूनच गोळी सुटली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महादेव ठाकरे हे २०१० मध्ये अमरावती एसआरपीएफ गटाला रुजू झाले होते.

गडचिरोलीतील ड्युटी संपली होती
महादेव ठाकरे ज्या "ई' कंपनीत कार्यरत होते, ती कंपनी सहा महिन्यांपूर्वीच गडचिरोलीला दाखल झाली होती. राज्यातील प्रत्येकच एक ना एका गटाची कंपनी गडचिरोलीला कायम बंदोबस्तासाठी जाते. या कंपनीच्या जागी तैनाती देण्यासाठी जालना गटाची कंपनी दोन दिवसांपूर्वीच गडचिरोलीत दाखल झाली आहे. मात्र, ३० एप्रिलला गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका आहेत. त्या निवडणुका पार पडताच ठाकरे यांची कंपनी अमरावतीला परत येणार होती. मात्र, तीन दिवसांपूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.

दोन दिवसांची रजा घेऊन झाले होते रुजू
ठाकरेयांनी आईच्या भेटीसाठी २३ २४ एप्रिलला रजा घेतली होती. त्यामुळे ते २५ एप्रिलला पुन्हा गडचिरोला रुजू झाले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत त्यांच्यासोबत ही घटना घडली आहे. या घटनेने एसआरपीएफ वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार
महादेवठाकरे यांचे पार्थिव घेऊन जवान गडचिरोलीवरून निघाले आहेत. मंगळवारी सकाळी वाशीम जिल्ह्यात असलेल्या ठाकरे यांच्या खरोडा या मूळ गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. एन.एन. सोळंके, प्रभारी समादेशक, एसआरपीएफ.