आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंट फ्रान्सिस स्कूलची सीबीएसई मान्यता रद्द -राज्य बोर्डात शिकवण्याची शाळा व्यवस्थापनाची तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सेंट फ्रान्सिस हायस्कूलची सीबीएसई अभ्यासक्रमाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. याबाबत संस्थेने माहिती कळवताच पालक गुरुवारी जुन्या बायपासवरील शाळेच्या इमारतीत धडकले. मुलांना राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमात शिकवण्याची तयारी शाळा व्यवस्थापनाने दर्शवली, तर पालकांनी हा प्रस्ताव धुडकावत सुविधांच्या नावाखाली घेतलेले पैसे परत करण्याची मागणी केली आहे.

डिव्हाइन संस्थेमार्फत संचालित सेंट फ्रांसीस हायस्कूलमध्ये पहिली ते आठवीपर्यंत सीबीएसई अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यात येत होते. आता अर्धे शैक्षणिक सत्र झाल्यानंतर सीबीएसई अभ्यासक्रमाची मान्यता रद्द झाल्याची माहिती संस्थेने पालकांना दिली. त्यामुळे संतप्त पालक शाळेत धडकले. शहरात मोजक्याच शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम शिकवला जातो.

प्रवेश घेतानाच सीबीएसई अभ्यासक्रमाची मान्यता रद्द झाल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली नाही, असे पालकांचे म्हणणे होते. सीबीएसई अभ्यासक्रमासाठी शुल्क वसूल करण्यात आल्यानंतर राज्य बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये मुलांना का शिकवावे, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या अन्य शाळेत पाल्याचा प्रवेश...

द्यावा किंवा अतिरिक्त शुल्क परत करावे, अशी मागणी या वेळी पालकांकडून करण्यात आली. दुसरीकडे सीबीएसई दर्जाचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात देऊ, असे आश्वासन संस्थेकडून पालकांना देण्यात आले. परंतु, पालक आणि व्यवस्थापनात चर्चा होऊनही यातून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे हताश होऊन परतण्याखेरीज पालकांना कोणताच मार्ग नव्हता.

अवाच्या सव्वा शुल्क : सीबीएसई अभ्यासक्रमासाठी हायस्कूलने पालकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल केले असल्याचा पालकांचा आरोप आहे. बिल्डिंग फंडच्या नावाखाली 17 हजार रुपये, तर महिन्याकाठी 650 रुपये शिकवणी शुल्क संस्था वसूल करते. दरमहा 15 तारखेपर्यंत शुल्क न भरल्यास 50 रुपये विलंब शुल्क द्यावे लागत असल्याची माहिती पालिकांनी दिली आहे.

260 विद्यार्थ्यांचे नुकसान :
सेंट फ्रांसीस हायस्कूलमध्ये पहिली ते आठवीपर्यंत 260 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सीबीएसई अभ्यासक्रमाची मान्यता रद्द झाल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी लटकले आहे.

अतिरिक्त शुल्क परत करा
मुलांना प्रवेश देताना संस्थेने सीबीएसई अभ्यासक्रमासाठी शुल्क घेतले होते. आता मध्येच मान्यतेची अडचण आली. पालक अतिरिक्त रक्कम मोजत असताना संस्थेने वचन पाळले पाहिजे. मुलांच्या भवितव्याशी खेळ का केला, याचे उत्तर द्यावे तसेच अतिरिक्त शुल्क परत करावे.
शिल्पा दवे, पालक

का नाकारली मान्यता?
एकाच इमारतीमध्ये सीबीएसई आणि राज्य बोर्डाचे अभ्यासक्रम चालवता येत नाहीत. सेंट फ्रांसीस हायस्कूलमध्ये हा प्रकार सुरू होता. त्यामुळे सीबीएसईची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्यांनी दिली. मात्र, सीबीएसई अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली वेगळी इमारत बांधणे सध्या तरी संस्थेला शक्य नसल्याचे संचालकांनी स्पष्ट केले.

पालकांना कल्पना होती
४सीबीएसई अभ्यासक्रमाच्या मान्यतेबाबत नियमांमध्ये बदल झाला. नव्या अटींची पूर्तता संस्थेला करता आली नाही. त्यामुळे अभ्यासक्रमाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. मान्यतेसाठी पाठवण्यात आलेला प्रस्ताव रद्द झाल्याची माहिती मुलांच्या भवितव्याचा विचार करून पालकांना पूर्वीच देण्यात आली होती.
राज चव्हाण, व्यवस्थापकीय संचालक