आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Transport News In Marathi, Maharashtra State Transport Corporation

1 एप्रिलपासून परिवहन वाहनांना ‘स्पीड गव्हर्नर’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी वाहनांची गती नियंत्रित करणे आवश्यक आहे. त्यामुळेच परिवहन संवर्गातील (ट्रान्सपोर्ट वेहिकल) प्रत्येक वाहनाला ‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. या नवीन आदेशाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून राज्यात होईल. वाहन परवाना नूतनीकरण किंवा नवीन वाहन नोंदणीच्या वेळी संबंधित वाहनांना ‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याची अट आरटीओने टाकली आहे.


आरटीओकडून नवीन वाहनांची नोंदणी करण्याच्या वेळी किंवा पूर्वी ज्यांनी वाहन खरेदी केले आहे, अशा परिवहन संवर्गातील वाहनांना यापुढे प्रतितास 80 किमी अशी गती निश्चित केलेले ‘स्पीड गव्हर्नर’ (वेग नियंत्रक उपकरण) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. परिवहन आयुक्तांचा या संबंधीचा आदेश प्रत्येक आरटीओ कार्यालयात नुकताच धडकला. एक एप्रिलपुढे तयार होणार्‍या परिवहन संवर्गातील वाहनांना कारखान्यांमध्येच ‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्यात यावे, अन्यथा वाहन विक्रेत्यांनी ते बसवावे, असे आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. यापूर्वी आरटीओकडून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या स्कूल बस आणि व्हॅन यांना ‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याचे आदेश होते. ‘स्पीड गव्हर्नर’ बसवल्यानंतर वाहनांची गती र्मयादित होणार आहे.


‘स्पीड गव्हर्नर’ बंधनकारकच
परिवहन आयुक्तांचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत. परिवहन संवर्गातील सर्व नवीन वाहनांना कारखान्यामधूनच ‘स्पीड गव्हर्नर’ लावण्याचे आदेश आहेत तसेच वाहन विक्रेत्यांनासुद्धा नवीन वाहनांना ‘स्पीड गव्हर्नर’ लावूनच विक्री करण्याचे आदेश आहेत. याच वेळी जुन्या वाहनांनासुद्धा एक एप्रिलपासून ‘स्पीड गव्हर्नर’ बंधनकारक करण्यात आले आहे. ’’ राजेंद्र वाढोकर,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती