आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत वादळाचा जबर फटका; पावसाने शहराला झोडपले; प्रशासनाची कसरत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- वादळी वार्‍याचा शहराला बुधवारी जबर फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने खांब वाकून तारा खाली आल्या. सुदैवाने या घटनेत मनुष्यहानी झाली नाही. तथापि, शहराच्या भीमटेकडी भागात वीज कोसळल्याने विजेच्या उपकरणांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे.

पंचवटी चौकातील शिवाजी बीएड महाविद्यालय, आरटीओ कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, राजापेठ पोलिस ठाण्यासमोर, हमालपुरा भागातील शिक्षक बँक परिसरातील झाडे कोसळली. रामपुरी कॅम्प भागात गणेश मंडळाच्या मांडवावरच झाड कोसळले तसेच येथील विजेचा खांबदेखील खाली आला. त्यामुळे येथे मनपाचा अग्निशमन विभाग व महावितरणच्या अधिकार्‍यांना चांगलीच कसरत करावी लागली. वार्‍याचा वेग प्रचंड असल्याने अनेक ठिकाणचे पोस्टर फाटले, तर काही फलक रस्त्यावर पडले होते.

बाप्पांनी टाळले चिमुकल्यांवरील विघ्न

वादळी पावसाचा फटका शहरातील कृष्णानगरालाही बसला. डॉ. लालचंद आवतरामाणी यांच्या घरासमोरील महापालिकेच्या बगिच्यातील एक वृक्ष गणपती मंडपावर कोसळला. वृक्षाच्या वजनामुळे महावितरणच्या विजेचा खांबही वाकला. मंडपात असलेली तीन बालके यात सुदैवाने बचावली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. त्यामध्ये गणेशमूर्तीचा हात भंगला. छताचा भाग मूर्तीच्या वरील बाजूला अडल्याने मंडपातील हितेश बालानी, राहुल गोस्वामी, रोमिल वालेचा हे तिघेही 12 वर्षीय चिमुकले बचावले. महापालिकेच्या अग्निशमन दल, अतिक्रमण हटाव पथकाने परिसर गाठला. महावितरणच्या कर्मचार्‍यांनी वीजपुरवठा बंद करून बचावकार्य सुरू केले होते.
तांत्रिक कॉलनीत अनेक घरांना फटका

शहराच्या बेनोडा-भीमटेकडी प्रभागातील तांत्रिक कॉलनीत सायंकाळी वीज कोसळ्याने अनेकांकडील विद्युत उपकरणे बंद पडली. मारोतराव शेळके यांच्या घराच्या आवारातील नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने आग लागली होती. त्यांच्या घरातील टीव्ही खराब झाला. राम कोलते यांच्या घराचा कोपरादेखील खचला. त्यांच्या घरातील टीव्ही तसेच चार पंखे खराब झाले. मनोहरराव भटकर, नितीन वानखडे, प्रभाकर येवतीकर, मनोहरराव अटाळकर, नरेंद्र येवले, मनोहरराव भुसाटे, राजेश वानखडे, राजू उघडे यांच्या घरातील विजेच्या उपकरणांची हानी झाली. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अविनाश मार्डीकर यांनी घटनास्थळ गाठून प्रशासकीय अधिकार्‍यांना माहिती दिली.