आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stramgaruma To Secure By 100 Police, Divya Marathi

अमरावतीमध्‍ये स्ट्राँगरूमला 100 पोलिसांचा पहारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी (दि. 10) मतदान पार पडल्यानंतर सर्व इव्हीएम बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाउन येथे जमा करण्यात आले आहेत. येथील स्ट्राँगरूमभोवती पोलिसांचा तगडा पहारा तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीपर्यंत पुढील महिनाभर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसह स्थानिक पोलिस कर्मचारी, अधिकारी येथे तैनात राहणार असून, सुरक्षा बळकट करण्यासाठी परिसरात 27 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
स्ट्राँगरूमवर बंदोबस्तासाठी 30 जवानांची रेल्वे सुरक्षा बलाची एक तुकडी तसेच पोलिसांचे 10 अधिकारी व 65 कर्मचारी तैनात आहेत. सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी स्ट्राँगरूमवर विशेष लक्ष ठेवून राहतील. येथे कार्यरत पोलिसांच्या 12-12 तासांच्या दोन शिफ्ट असून, निरीक्षक दर्जाचा अधिकारी येथे 24 तास तैनात आहे.
स्ट्राँगरूमला बाहेरून रेल्वे पोलिस बलाच्या जवानांचा सुरक्षा वेढा राहणार असून, अंतर्गत सुरक्षा स्थानिक पोलिस सांभाळणार आहेत. परिसरातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सध्या 24 सीसीटीव्ही कॅमेरांची नजर परिसरावर असून, आणखी तीन ते चार कॅमेरा लावले जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथील सर्व गोदामे रिकामी करण्यात आली असून, एका गोदामात संपूर्ण इव्हीएम ठेवल्या आहेत. 16 मे रोजी दोन गोदामांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे.
टॉवरवर राहणार सशस्त्र पोलिस
स्ट्राँगरूम परिसरात पाच टॉवर उभारले असून, त्यावर सशस्त्र पोलिस तैनात करण्यात येणार आहे. नेमाणी गोदामाच्या परिसरात बाह्य व आंतरिक सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात हे टॉवर उभारण्यात आले आहेत. प्रत्येकी 20 ते 25 फुटांच्या टॉवरवरून परिसरात सर्वदूर लक्ष ठेवणे पोलिसांना सहज शक्य होणार आहे.
27 सीसीटीव्ही कॅमेरा, टेहळणी मनोरे