आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीला मागितली पाच लाखांची खंडणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणार्‍या यवतमाळच्या युवतीचा पाठलाग करीत मोबाइलवरून तिच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी युवतीने यवतमाळ पोलिसांकडे दाखल केलेली तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांकडे मंगळवारी (दि. 4) वर्ग करण्यात आली.
खंडणीची मागणी करणारा 23 वर्षीय युवक हा युवतीच्या परिचयाचा आहे. सचिन राजूसिंह राठोड (रा. सुकळी, यवतमाळ) असे त्याचे नाव आहे. त्याने पाठलाग करीत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तसेच आपल्याकडे खंडणी मागितल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. खंडणी न दिल्यास बदनामी करण्याची धमकीही त्याने दिली होती. हे प्रकरण अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलिसांच्या हद्दीतील असल्याने यवतमाळ पोलिसांनी संबंधित प्रकरण मंगळवारी फ्रेजरपुरा पोलिसांकडे वर्ग केले. तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सचिन आणि तक्रारकर्त्या युवतीची पूर्वीच ओळख आहे. सध्या ही युवती शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेते. आठ ते दहा दिवसांपूर्वी त्याने युवतीचा पाठलाग केला. सचिनने युवतीच्या मोबाइलवर संपर्क करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास बदनामी करण्याची धमकीही त्याने दिली. युवतीचे फेसबूक अकाउंट सचिनने बंद केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, घटनास्थळ फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे प्रकरण अमरावती पोलिसांकडे वर्ग झाले आहे. या प्रकरणी मंगळवारी फ्रेजरपुरा पोलिसांनी सचिनविरुद्ध विनयभंग, खंडणी मागणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.