आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाठ्यपुस्तके मिळणार 12 हजार विद्यार्थ्यांना मोफत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भातकुली - नवीन शैक्षणिक सत्र 26 जूनपासून सुरू होणार आहे. याची पूर्वतयारी म्हणून सर्वशिक्षा अभियानांतर्गत भातकुली तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील तब्बल 12 हजार 26 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळेत नवीन प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने स्वागत करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश वितरित करण्यात येणार आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी पोषण आहारामध्ये गोड पदार्थ देण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (दि. 26) शाळेत पाठवण्याचे आवाहन भातकुली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राऊत, संतोष घुगे, नितीन उंडे, गटसमन्वयक नरेंद्र धनस्कर, केंद्रप्रमुख निता सोमवंशी, एम. ए. हुसेनी, स्मृती बाबरेकर, नंदकिशोर राऊत, सुरेश रहाटे आदींनी केले आहे. शाळा शुभारंभ कार्यक्रमाचे फोटोग्राफी किंवा व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी डॉ. राऊत यांनी दिले आहेत.

गुरुजींना अशी करावी लागणार पूर्वतयारी
23 जून - मुख्याध्यापक व सहायक शिक्षकांना सकाळी आठ ते दहा या वेळेत शाळेच्या वर्गखोल्या, शालेय परिसर स्वच्छता, सर्वेक्षणानुसार पटनोंदणी करणे, शालेय दस्तऐवज अद्ययावत करून घ्यावे लागणार आहे.

24 जून - सकाळी आठ ते दहा या वेळेत सरपंचांसह पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सदस्य आणि विविध खात्यांचे सभापतींना शाळा शुभारंभासाठी गुरुजींना आमंत्रित करावे लागेल.

25 जून - शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ, शिक्षक-पालक संघाची बैठक घेऊन गृहभेटी देतील.

26 जून - या दिवशी शाळा सुरू होणार असून, शाळा सकाळी आठ वाजता सुरू होतील. सर्वप्रथम गावातून प्रभातफेरी, राजर्षी शाहू महाराज जयंती आणि नव्याने प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचे मान्यवर गुलाबपुष्प देऊन स्वागत करतील. यानंतर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेशाचे वितरण होईल. दुपारी 12 वाजता प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात करायची आहे.
6,241 विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश
भातकुली पंचायत समितीत 112 जिल्हा परिषदेच्या शाळा, 26 अनुदानित आणि सहा विनाअनुदानित शाळा आहेत. या सर्व शाळांतील तब्बल 6,241 विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत गणवेश वितरित केले जाणार आहे.
गुरुजी लागले कामाला
23 जूनपासून शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या स्वागताची व इतर पूर्वतयारी करण्यासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि सहायक शिक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाने पाठवलेल्या परिपत्रकात 23 पासून शाळास्तरावर शुभारंभाच्या दृष्टिकोनातून राबवायचा कार्यक्रम व कामाचे विवरण दिले आहे.