अमरावती- येथील भूविकास बँकेत कार्यरत राजेंद्र गुरुदासजी काळबांडे या 45 वर्षीय लिपिकाने बुधवारी त्यांच्या मूळ गावी सावरखेड येथे विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. मागील दोन वर्षांपासून पगार झाला नसल्याने आर्थिक विवंचनेत काळबांडे यांनी हा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता मृतकाचे नातेवाईक व कार्यालयीन सहकार्यांनी व्यक्त केली आहे.
काळबांडे यांनी बुधवारी सकाळी इर्विन चौकात असलेल्या भूविकास बँकेत हजेरी लावली होती. त्यांनी कार्यालयात येऊन स्वाक्षरी केली, त्यानंतर ते त्यांचे मूळ गाव सावरखेड येथे गेले. गावाला गेल्यानंतर त्यांनी नेरपिंगळाई ते सावरखेड या मार्गावर विष घेतले. दुपारच्या वेळी ते अत्यवस्थ स्थितीत या मार्गावर पडून होते. घटनेची माहिती मिळताच गावकर्यांनी त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
काळबांडे हे मागील अनेक वर्षांपासून भूविकास बँकेत कार्यरत होते. अमरावतीला येण्यापूर्वी त्यांनी जिल्ह्यातील काही तालुकास्तरावरील शाखांमध्ये काम केले होते. मागील तीन वर्षांपासून भूविकास बँका अखेरचा श्वास घेत आहेत. त्यामुळे तालुकास्तरावरील बँक बंद झाल्यात. ते कर्मचारी अमरावतीच्या बँकेत आले. मागील दोन वर्षांपासून राजेंद्र यांचा पगारच झाला नव्हता, असे त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. त्यांच्याच प्रमाणे इतर बँकांतील कर्मचार्यांचेही पगार झाले नसल्याची माहिती काळबांडे यांच्या सहकार्यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
सध्या काळबांडे कुटुंबीयांसह अमरावतीला भाड्याच्या घरात राहत होते. बँकेतील कर्मचार्यांचे वेतन व्हावे, यासाठी यापूर्वी अनेकदा शासनाला निवेदन दिले, धरणे केली. तरीही वेतन झाले नाही. आता याच विवंचनेतून आमच्या सहकार्याचा बळी गेला आहे. आता तरी शासनाने विचार करावा, असे काळबांडे यांचे बँकेतील सहकारी आपापसात चर्चा करीत होते.
काळबांडेंचा मुलगा अपंग
राजेंद्र काळबांडे यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. पत्नी वनिता, मोठा मुलगा आणि लहान मुलगा संचित तसेच आई आणि आजी, असा परिवार आहे. यातच लहान मुलगा संचित हा अपंग आहे. त्याला चालता येत नाही. त्याच्यावर उपचार करणे, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, अशी स्थिती असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. राजेंद्र हेच कुटुंबाचे मोठे आधार होते. त्यांच्या मृत्यूमुळे काळबांडे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.