आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Bhat News In Marathi, Marathi Poet, Poems, Divya Marathi, Amravati

सुरेश भट यांच्या कवितेने गहिवरले होते तत्कालीन मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सांग मला दळणार्‍या जात्या जात नेमकी माझी
ज्यांचे झाले पीठ, आता ते दाणे कुठले होते?

कविवर्य सुरेश भट यांनी पत्रातून लिहिलेल्या या चार अप्रकाशित ओळी वाचल्या आणि राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आजपासून 11 वर्षांपूर्वीची ही घटना अमरावतीकर विसरले नाहीत. प्रसंग होता, सुरेश भट प्रतिष्ठानच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना सुरेश भटांनी एक खास पत्र पाठवून अभिनंदन केले होते. या पत्रात भटांनी लिहिलेल्या चार ओळी शिंदे यांनी कार्यक्रमादरम्यान वाचून दाखवल्या होत्या. सुरेश भटांबद्दल मुख्यमंत्र्याच्या भावना तेव्हा महाराष्ट्रास अनुभवता आल्या. जातीपातीचे राजकारण करणार्‍या समाजातील व्यक्तींना या चार ओळींमध्ये भटांनी दिलेला हा धडा होता. एवढे प्रचंड सार्मथ्य सुरेश भटांच्या काव्यरचनेत होते.


आयुष्य बेचिराख तरीही मजेत मी
आली व्यथा कवेत, व्यथेच्या कवेत मी

अशा एकाहून एक सरस गझलांचे लेखक सुरेश भटांचा जन्म इथला आणि त्यांचे काव्यही येथेच बहरले. या थोर प्रतिभावंत मराठी गझलकाराची आज 82 वी जयंती. यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.
राजकमल चौकातील गड्डा हॉटेलसमोरील मैफल ते ब्रिटनमधील अल्बर्ट हॉलपर्यंत गझलांच्या माध्यमातून रसिक र्शोत्यांना बांधून ठेवणार्‍या सुरेश भटांची कीर्ती जगभरच होती. जवाहर रोडवरील 27 खोल्यांच्या वाड्यात भट यांचे वास्तव्य होते. गोपालनगर परिसरातील भटवाडी नामक जागेतील त्यांचे निवासस्थान आजही शाबूत आहे. 1960 पर्यंत भट अमरावतीत होते. त्यानंतर ते नागपुरात वास्तव्यास गेले. त्यांचे त्याकाळचे सहकारी प्रा. राम शेवाळकर, प्रा. डॉ. विठ्ठल वाघ, मधुकर केचे, सुरेश द्वादशीवार, वामन तेलंग अशी दिग्गज प्रतिभावंत मंडळी भटांच्या मैफलीकरिता अमरावतीत तळ ठोकून असायची. डॉ. मोतीलाल राठी, वली सिद्दिकी, रामदासभाई र्शॉफ, दादा इंगळे हे गड्डा हॉटेलच्या पुढे रंगणार्‍या मैफलीतील भटांचे सहकारी.
इतकेच मला जाताना
सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका
जगण्याने छळले होते

या सारख्या शेकडो गाजलेल्या गझलांची रचना करणार्‍या अशा थोर मराठी गझलकारास मानाचा मुजरा.