आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन हजारांची लाच घेणाऱ्या तलाठ्याला पकडले रंगेहात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- सात-बाराशासकीय अनुदानाची रक्कम बँकेत जमा करण्यासाठी शेतकऱ्याकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सचिन शिवाजी वाघ (३०, रा. शास्त्रीनगर, धामणगाव रेल्वे) असे लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याचे नाव आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर-शेंदूरजना या गावात सचिन वाघ हे कार्यरत असून, बुधवारी (िद. २७) तलाठी कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शेताचा सात-बारा आणि शेताचे नुकसान झाले असल्यामुळे शासकीय अनुदान मिळावे, अशी मागणी एका शेतकऱ्याने तलाठी वाघ यांच्याकडे केली होती. शासनाकडून अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी तलाठी वाघने संबंधित शेतकऱ्याला चार हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, ही रक्कम जास्त होत असल्याने तीन हजार रुपये देण्याचे ठरले, असे तक्रारदार शेतकऱ्याने तक्रारीत नमूद केले आहे.
रक्कम देण्यापूर्वी शेतकऱ्याने वाघची अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी तळेगाव दशासर येथे सापळा रचला. दरम्यान, संबंधित शेतकऱ्याकडून तलाठी सचिन वाघ तीन हजार रुपयांची लाच स्वीकारत असतानाच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध तळेगाव दशासर पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मागील दोन वर्षांपासून शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाने त्रस्त झाले आहेत. पेरणी केलेल्या बियाण्यांचा खर्चसुद्धा पेरणीनंतरच्या पिकातून मिळणार की नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही, त्यातही शासकीय सेवक शेतकऱ्यांना लाच मागत असतील, तर शेतकऱ्यांनी करावे तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बातम्या आणखी आहेत...