आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत सभासदांचे नाव थकबाकीदारांमध्ये; शिक्षक बँकेच्या आमसभेत खडाजंगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - दर्यापूर येथील दोन मृत शिक्षकांची नावे थकबाकीदारांच्या यादीत दाखवल्याच्या मुद्द्यावरून अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या आमसभेत रविवारी प्रचंड गोंधळ झाला. सभासदांची आरडाओरड आणि तिखट शब्दांतील मांडणीअंती अनेकांनी संचालक मंडळाच्या राजीनाम्यासह वसुली विभागाच्या कर्मचार्‍याच्या निलंबनाची मागणी केली.

बँकेचे सभासद सुनील कुकडे यांनी विचारलेल्या प्रश्नावरून हा मुद्दा चर्चेला आला. कर्जबाकी निर्लेखित करण्याच्या यादीमध्ये दर्यापूरचे विजय तायडे आणि बा. जा. भडांगे यांच्यासह जिल्ह्यातील 41 जणांचा समावेश आहे. आमसभेच्या कार्यक्रम पत्रिकेतील हा मजकूर वाचल्यानंतर कुकडे यांनी विहित मुदतीतच बँकेच्या संचालक मंडळाकडे या संदर्भातील लेखी प्रश्न पाठवला होता. दरम्यान, विषय पत्रिकेतील नियोजित विषय संपल्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने हा मुद्दा चर्चेला आला. मधुकर चव्हाण व इतरांनीही त्यात सहभाग घेतला.

मृत सभासदाच्या नावांचा अशाप्रकारे उल्लेख म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांचा उपमर्द आहे. ते कदापिही खपवून घेतले जाणार नाही, असे आग्रही मत प्रश्नकर्त्यांनी मांडले. निर्लेखनाच्या नावाखाली गेल्या काही वर्षांपासून मृत सभासदांची नावे अहवाल पुस्तिकेत लिहिली जात आहेत. हा त्यांच्या नातेवाइकांचाच उपमर्द नसून ज्या शाखेने (दर्यापूर) त्यांना कर्ज दिले होते, त्या शाखेचा-गावाचाही अपमान आहे, अशा तीव्र शब्दात प्रश्नकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या.

शिक्षक सहकारी बँकेची आमसभा रुक्मिणीनगर स्थित अतुल मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. पीठासीन सभापती तथा बँकेचे अध्यक्ष विलास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीनच्या सुमारास आमसभेचे कामकाज सुरू झाले. प्रारंभी विषयपत्रिकेवरील पंधरा मुद्दे चर्चेला घेतले गेले. त्यापैकी बहुतेक पारित झाले. उपाध्यक्ष किशोर मुंदे, संचालक विजय देशमुख, गोकुलदास राऊत, किरण पाटील, उमेश गोदे, संजय भेले, अनिल कोल्हे, ज्योती उभाड, मंजुषा कोरडे, सरव्यवस्थापक सुरेश ढाले आदी मंचावर उपस्थित होते. जि.प कर्मचारी संघटनेचे पंकज गुल्हाने, चंद्रकांत घाटे, गजानन जुनघरे, नरेश खांडेकर यांनीही आमसभेला हजेरी लावली.

काय आहे निर्लेखन ?
एखाद्या सभासदाकडे दीर्घकाळ थकीत राहिलेले कर्ज वसूल होण्याची शक्यता मावळल्यानंतर निर्लेखनाच्या खात्यात (एनपीए) टाकावे लागते. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने त्यासाठी काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. त्यानुसार प्रारंभी अशा सभासदांची नावे आमसभेसमोर ठेवून कर्ज वसुली का होऊ शकत नाही, हे सोदाहरण स्पष्ट करावे लागते. आमसभेच्या मान्यतेनंतर कर्ज निर्लेखित केले जाते.

थकबाकी किती ?
ज्या दोन सदस्यांच्या नावांमुळे हा मुद्दा गाजला, त्यांच्याकडे अत्यल्प थकबाकी आहे. भडांगे यांच्या नावे 5 हजार 930, तर तायडे यांच्या नावे 65 हजार 527 रुपये थकीत आहेत. याशिवाय इतर सर्व 41 सदस्य मिळून अवघे आठ लाख 82 हजार 609 रुपये थकीत आहे. मुळात तायडे, भडांगे यांच्याकडील थकबाकी व्याजाची असून त्यांनी मुद्दल पूर्ण भरले, हे संचालक मंडळाने आधीच स्पष्ट केले होते.

कुकडेंना समर्थन
ही मांडणी सुरू असतानाच अवघे सभागृह कुकडे यांंच्या बाजूने उभे ठाकले. काहींनी थेट हा मुद्दा मृताच्या कफनावरील रुपया पळवण्यासारखा असल्याचे म्हटले. त्यामुळे सदर बाब वसुली विभागावर ढकलून बेजबाबदारपणे वागणार्‍या संचालक मंडळालाच दंडित केले पाहिजे, असा अनेकांचा सूर होता. याचेच पर्यावसान पुढे संचालक मंडळाच्या राजीनाम्याच्या मागणीपर्यंत पोहोचले.

अध्यक्षांनी पुढे केला तांत्रिक मुद्दा : सभाध्यक्ष विलास देशमुख यांनी त्यातील तांत्रिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. निर्लेखनाची प्रक्रिया कशी होते, त्यामागे आरबीआयची काय भूमिका आहे, हे सर्व समजावून सांगण्याचा ते प्रयत्न करीत होते. तथापि, उपस्थित सभासद ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळेच संचालक मंडळाच्या राजीनाम्यासह वसुली विभागातील कर्मचार्‍यांच्या निलंबनाची मागणी पुढे आली.

शाखाविस्ताराच्या मुद्द्यावर चर्चा
निर्लेखनापूर्वी सभासदांनी बँकेच्या शाखाविस्ताराचा मुद्दा उपस्थित केला. हजार सभासद संख्येखेरीज शाखा उघडता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातच नव्हे, तर विभागात कोठेही शाखा उघडायची असेल, तर शिक्षकांसह इतरांनाही सभासद करून घेणे गरजेचे आहे. - विलास देशमुख, अध्यक्ष.