आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीईटीमुळे वाढलेय भावी शिक्षकांचे ‘टेन्शन’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 15 डिसेंबरला झाली होती. आता 40 दिवस उलटल्यानंतरही निकाल लागला नसल्याने भावी शिक्षकांचे टेन्शन आणखी वाढले आहे. जिल्ह्यातील 21 हजार उमेदवारांनी टीईटी दिली. टीईटीमध्ये 60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणार्‍यालाच शिक्षक म्हणून नोकरी करता येणार आहे.

टीईटीमध्ये डीएड आणि बीएड पात्रताधारक युवकांसाठी वेगवेगळे दोन पेपर घेण्यात आले होते. डीएड पात्रताधारकांसाठी पहिल्या टप्प्यात 150 गुणांची परीक्षा शहरातील 60 केंद्रांवर घेण्यात आली होती. त्यासाठी शिक्षण विभागाकडे 15 हजार 112 अर्ज आले होते. त्यापैकी 14 हजार 190 प्रत्यक्ष परीक्षेला बसले. बीएड पात्रताधारकांसाठी दुसर्‍या टप्प्यात 29 परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. शासनाने घेतलेली पहिलीच टीईटी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातही कुतूहलता आणि भीती होती. दोन्ही टप्प्यांमध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका होत्या. यामध्ये इंग्रजी, मराठी, पर्यावरण, बाल मानसशास्त्र आणि मराठी या आधारे प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्न काठिण्य पातळीपलीकडचे असल्याचा आरोप करून परीक्षाच रद्द करण्याची मागणी उमेदवारांनी केली होती. मात्र, 40 दिवस झाल्यानंतरही ना निकाल घोषित झाला, ना उमेदवारांच्या मागणीवर निर्णय झाला.

टीईटीचा निकाल न आल्याने उमेदवारांच्या प्रगतीच्या वाटा तूर्तास थांबल्या आहेत. कारण नोकरीची संधी आल्यास त्यांना प्रथम टीईटीमध्ये 60 टक्के उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक द्यावे लागेल. डीएड आणि बीएड पात्रताधारकांची संख्या लक्षात घेता, टीईटीचा निकाल लवकर अपेक्षित होता. मात्र, अजूनही निकाल न आल्यामुळे हे युवक चिंताग्रस्त दिसून येत आहेत. टीईटीच्या परीक्षेची संभाव्य उत्तरपत्रिका शिक्षण विभागाकडून एक महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आली होती. या उत्तरपत्रिकेसंदर्भात आक्षेप उमेदवारांना 30 डिसेंबरपर्यंत नोंदवायचे होते. मात्र, त्यानंतरही निकाल जाहीर झालेला नाही.